होळीनिमित्त ठिकठिकाणी नाकाबंदी, उभारण्यात आले ३९ फिक्स पाईंट; दारू पिऊन वाहने चालविल्यास जेलची हवा
होळीनिमित्त ठिकठिकाणी नाकाबंदी, उभारण्यात आले ३९ फिक्स पाईंट; दारू पिऊन वाहने चालविल्यास जेलची हवा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर :होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून नाकेबंदीही करण्यात आली आहे. त्यासाठी विविध ३९ फिक्स पॉईन्ट लावण्यात येणार आहे. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्येच होळी साजरी करावी लागणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून समाजकंटकांचा शोध सुरू आहे. याला तीव्रता देण्यात आली असून पोलीस सर्व हिस्ट्री शीटर्सच्या घरांवर छापे टाकून प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत. निवडणुका आणि होळीच्या संदर्भात पोलिस अलर्ट मोडवर आहेत. पोलिस अनेक दिवसांपासून गुन्हेगारांना अटक करत आहेत.
होळीच्या नावावर गोंधळ घालणाऱ्यांना अजिबात खपवून घेणार नाही. यासाठी शनिवारी रात्रीपासून सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आपापल्या भागात गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व सार्वजनिक होळी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांची पथके निगरानी करतील. याशिवाय रविवारी सायंकाळपासूनच सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवारी दारूविक्रीवर बंदी असणार आहे. अशा स्थितीत अवैध दारू विक्रेते सक्रिय होतात. त्यामुळे पोलिसांनी आत्तापासून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली असून विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली जात असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
रॅश ड्रायव्हिंग केल्यास गुन्हा
शहरातील सर्व प्रवेश स्थळांवर पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. ३८ ब्रेथ ॲनालायझरद्वारे चालकांची चाचणी केली जाईल. दारू पिऊन गाडी चालवताना कोणी पकडले तर त्याला होळीचा दिवस पोलिस ठाण्यातच काढावा लागतो. यासोबतच रॅश ड्रायव्हिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. हे पथक विविध मार्गांवर गस्त घालणार आहे. असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त शशीकांत सातव यांनी दिली आहे.
छेडखानी झाल्यास १०९१ वर कॉल करा
कोणत्याही परिस्थितीत परवानगीशिवाय कोणत्याही महिलेला किंवा मुलीला रंग लावू नका. सर्व मुलींच्या वसतिगृहांसमोर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल गस्त घालणार आहेत. महिलांच्या सुरक्षेला पोलिसांचे प्राधान्य आहे. ११२ व्यतिरिक्त महिलांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास १०९१ या क्रमांकावर महिला दामिनी पथकाची मदत घेता येईल. वाहनचालकांवर फुगे फेकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनाचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत