टाकळघाट परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसणार कधी ?
विशेष ग्रामसभेत नागरिक आक्रमक : पोलिस प्रशासनाविरुद्ध रोष
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, टाकळघाट : एमआयडीसी बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या टाकळघाट (ता. हिंगणा) परिसरातील फोफावलेले अवैध धंदे आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाचे पडसाद प्रजासत्ताकदिनी टाकळघाट व ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत उमटले. पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अवैध धंदे वाढल्याचा आरोप करीत त्यांना आळा घालण्याची मागणीही नागरिकांनी या ग्रामसभेत केली.
वसाहतीमुळे औद्योगिक टाकळघाट, गणेशपूर, सुकळी, टेंभरी या गावांमध्ये वास्तव्याला असणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असून, बहुतांश कामगार बाहेरून आलेले आहेत. ही सर्व गावे एमआयडीसी बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. या गावांसह परिसरात मटका, जुगार, गांजा व दारूविक्री, आठवडी बाजारातील चोऱ्या तसेच घरफोडीसह इतर अवैध धंदे तसेच गुन्हेगारी वाढली आहे, असा गंभीर आरोप करीत नागरिकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र, काहीच उपयोग झाला नाही, असा आरोपही नागरिकांनी या ग्रामसभेत केला असून, या अवैध धंद्यांना कायमचा आळा घालण्याची व अवैध धंदेवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गांजा व दारुविक्रीला आले उधाण
टाकळघाटसह परिसरातील अन्य गावांमध्ये गांजा आणि दारूविक्री खुलेआम व मोठ्या प्रमाणात केली जाते. काहीजण सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढत व दारू पीत बसलेले दिसतात. या भागात गांजा आणि दारु नेमकी कुठून व कशा पद्धतीने आणली जाते, गांजा व दारूविक्रेते, पुरवठादार व वाहतूकदार कोण आहेत, याबाबत पोलिसांना इत्थंभूत माहिती आहे. मात्र, मुद्दाम कारवाई केली जात नाही, असा आरोपही नागरिकांनी केला.
विद्यार्थ्यांमध्ये भीती, तर पालक चिंतित
टाकळघाट येथील दुर्गा चौकात निस्ताने विद्यालय आहे. या चौकात तसेच बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र व हनुमान मंदिर परिसरात खुलेआम सट्टापट्टी व मटका स्वीकारला जातो. त्यातच या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचाही वावर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांवर या प्रकाराचा परिणाम होणार तर नाही ना या विचारामुळे पालकही चिंतित असतात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत