जि.प.शिक्षकाने केला गुरुचा सत्कार
जि.प.शिक्षकाने केला गुरुचा सत्कार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : आदिवासी बहुल कोहळा खेड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तुळशीराम रामाजी हुंगे यांनी त्यांचे ' गुरु ' निवृत्त मुख्याध्यापक राजूजी चिचुलकर यांचा सपत्नीक भावपूर्ण सत्कार केला. सदर कृतज्ञ सोहळ्याने शिष्यासह उपस्थितांचेही डोळे पाणावले. यावेळी शाळेत उपसरपंच भोलाजी कोकुर्डे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी साहित्यिक व पुरातत्त्व संशोधक डॉ. मनोहर नरांजे, योगेश गजभिये, मनोहर बेले, मुख्याध्यापक युसुफ पठाण, रत्नाताई चिचुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
हूंगे यांना चिचूलकर यांनी उमरेड नगर परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरी ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण दिले. हुशार असल्याने तुळशीराम हुंगे हे गुरूंचे आवडते शिष्य होते. मौलिक मार्गदर्शन व पायाभूत शिक्षणामुळेच मी शिक्षक होऊ शकलो .अशी कृतज्ञता हुंगे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या गुरूचा शाल, श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार केला. हुंगे यांची बदली झाल्याने त्यांनाही याच कार्यक्रमात शाळेतून निरोप देण्यात आला. त्यामुळे गुरु शिष्यांच्या या अनोख्या सोहळ्याने उपस्थित विद्यार्थी व पालक भारावून गेले.
नरांजे व गजभिये यांनीही या कार्यक्रमाचे आपल्या भाषणातून कौतुक केले. मुख्याध्यापक पठाण यांनी प्रास्ताविक केले. चौथीची विद्यार्थिनी सोनाली हरिदास सोनटक्के हिने उपस्थितांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत