"तळजाईवर कुत्री आणू नये, कुत्र्यांचे लाड घरी करा, गादीवर झोपवा" : अजित पवारांचा पुणेकरांना टोमणा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळजाई वनउद्यान प्रवेशद्वार उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार हे उद्घाटन करूनच थांबले नाहीतर त्यांनी वनोद्यानाची चांगली लांबलचक रपेटही मारली.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी आज पुन्हा एकदा सकाळी सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊन अधिकाऱ्यांची पळापळ केली निमित्त होतं तळजाई (Taljai Pune) वनउद्यान प्रवेशद्वार उद्घाटनाचं.... अजितदादा फक्त उद्घाटन करूनच थांबले नाहीतर त्यांनी वनोद्यानाची चांगली लांबलचक रपेटही मारली. बांबू वृक्षारोपणही केलं, अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या. तसंच एका पक्ष पदाधिकाऱ्याने नाश्ता विचारताच मी दीक्षित डायटवर असल्याचं गुपितही सांगून टाकलं. यावेळी अजित पवारांनी तळजाई टेकडीवर होणाऱ्या घाणीवरुन पुणेकरांना चांगलाच टोलाही लगावला आहे.
कुत्र्यांचे लाड घरी करा, हवं तर गादीवर झोपवा
तळजाई टेकडीवर होणाऱ्या घाणीच्या साम्राज्यावरुन अजित पवारांनी पुणेकरांना चिमटा काढला आहे. अजित पवार म्हणाले, पुणेकरांनी तळजाईवर पाळीव कुत्री आणू नयेत. कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा, हवं तर गादीवर झोपवा... पण इथं तळजाईवर नको असं म्हणत अजित पवारांनी तळजाईवर मॉर्निंग वॉकला येताना कुत्रे घेऊन येणाऱ्या पुणेकरांना टोमणा मारला आहे.
तळजाईवर 1 रूपया पार्किंग चार्ज लावतात आणि पुणेकर ओरडतात, काही पठ्ठेतर थेट कोर्टातच जातात.... पुणेकरांचा स्वभाव आपल्याला सर्वांना माहिती आहे. अरे कोर्टात जाण्याआधी पहिले चर्चेला तर या... सरकारी चर्चेतून मार्ग काढता येतो असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, मी तळजाईकडे येताना बघितलं लोक रस्त्यावरच कचरा टाकतात हे बरं नाही. भटकी कुत्री तळजाईवर येतात, काही लोक पाळीव कुत्री पण फिरायला घेऊन येतात, हे थांबलं पाहिजे. तळजाईवरची ससे आणि मोर कुत्री खातात, या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तळजाईवर वनोद्यानाचं सौंदर्य टिकलं पाहिजे, इथली झाडं जगवण्यासाठी टेकडीवर पाइपलाईन टाकावी लागेल, त्यासाठी मी निधी देतो. इथलं फुलपाखरू उद्यान बहरलं पाहिजे. तळजाईमुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळतोय, म्हणजे हे वनउद्यान टिकलं पाहिजे.
सकाळी उठावे लागते म्हणून कुरबूर नको
अधिकाऱ्यांना पुणे पोस्टिंग पाहिजे असेल तर सकाळी उठायलाच पाहिजे, कारण मी सकाळीच कामाला सुरूवात करतो, हे अधिकाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवावं. अजित पवारांमुळे अधिकाऱ्यांना पण सकाळी उठावं लागतं... पुन्हा अशी कुरबूर नको. मी आज ठरवून तळजाईवर आलो, मला इथली कामं बघायची होती, लोकांनाही भेटलो समस्या जाणून घेतल्या असंही अजित पवार म्हणाले.
सरकार स्थापन झाल्यापासून कुरघोडीचं राजकारण
नवाब मलिकांच्या अटकेच्या संदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, मला याच्यावर काहीही बोलायचं नाहीये. मी माझं काम करत राहणार, स्वत: पवार साहेब बोलले. काल सीएम पण बोलले आहेत. विरोधकांचे हे कुरघोडीचं राजकारण सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. काहीजण पहाटे ट्विट करून माहिती कशी देऊ शकतात, यावरूनच तुम्ही समजून घ्याना... हे नेमकं काय सुरू हे ते. नवाब मलिकांनी त्यांची बाजू या पूर्वीच मांडलीय, तरीही अटक झाली, यावरून काय बोध घ्यायचा तो जनतेनं घ्यावा. सुडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काल पण काही ठिकाणी धाडी पडल्या हे तुम्ही बघताच आहात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत