९ कोटींचा रस्ता की भ्रष्टाचाराचा महामार्ग ? बाखर्डी – नोकारी मार्गावरील निकृष्ट कामामुळे संतापाची लाट
रस्ता सुरू होण्यापूर्वीच खचला; पावसाळ्यापूर्वी पूल अपूर्ण, शेतकऱ्यांचे नुकसान अटळ? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील बाखर्डी–नोकारी काँक्रिट रस्त्याचे काम सध्या नागरिकांच्या चर्चेचा आणि संतापाचा विषय बनले आहे. खनिज विकास निधीतून तब्बल ९ कोटी रुपये खर्च करून उभारला जाणारा हा रस्ता प्रत्यक्षात विकासाचे प्रतीक ठरणार की सार्वजनिक पैशांच्या उधळपट्टीचा आणखी एक नमुना ठरणार, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
रस्त्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी रस्त्याची पातळी बिघडलेली दिसून येत आहे. काही भागात काँक्रिटचा पृष्ठभाग खचल्याचे आणि दबल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे रस्ता अद्याप पूर्णपणे जनतेच्या वापरासाठी खुला झालेला नसताना ही अवस्था निर्माण झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
उद्घाटनाआधीच रस्त्याला तडे; मग हमी कोण देणार?
काँक्रिट रस्त्याच्या बांधकामामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे क्युरींग. मात्र स्थानिकांच्या मते, अनेक ठिकाणी काँक्रिटला आवश्यक तेवढे पाणी न दिल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. जर उद्घाटनापूर्वीच रस्ता खचत असेल, तर काही महिन्यांनंतर त्याची अवस्था काय असेल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
रस्त्याच्या नावाखाली धोकादायक खड्ड्यांची निर्मिती?
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरणा करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे रस्त्यालगत खोलगट भाग तयार झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिकांच्या शब्दांत सांगायचे तर, "हा रस्ता आहे की खोदलेला नाला?"
पावसाळा दारात, पूल अर्धवट; प्रशासन कोणाची वाट पाहत आहे?
या मार्गावरील दोन नाल्यांवर पूल बांधण्याचे काम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असताना काम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पहिल्याच पावसात वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि कामगारांना जीव धोक्यात घालून नाले पार करावे लागले, तर त्यासाठी जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने जनतेला द्यावे, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी, पण प्रशासनाच्या डोळ्यात नाही?
रस्त्यालगत योग्य ठिकाणी पाईप किंवा पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांचे शेतात जाण्याचे मार्गही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
९ कोटी खर्च झाले, पण जबाबदारी कोणाची?
सार्वजनिक पैशांतून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाबाबत आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
- कामाच्या गुणवत्तेची तपासणी कोणी केली?
- संबंधित अभियंत्यांनी नियमित पाहणी केली का?
- निकृष्ट कामाबाबत तक्रारी असूनही कारवाई का झाली नाही?
- पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण न झाल्यास जबाबदार कोण?
- हे प्रश्न केवळ नागरिकांचे नसून करदात्यांच्या पैशांशी संबंधित आहेत.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, कामाची गुणवत्ता तपासावी आणि दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
"९ कोटी रुपये खर्च करून जर निकृष्ट दर्जाचा रस्ता उभा राहत असेल, तर हा विकास नसून जनतेच्या पैशांवरील अन्याय आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी," अशी संतप्त भावना परिसरात व्यक्त होत आहे.
बातमी संकलन : सतीश जमदाडे, नांदा फाटा
(लवकरच महा घडामोडी न्यूज च्या यूट्यूब चॅनेलवर ही व्हिडिओ बातमी बघायला मिळेल.)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत