बारावीची परीक्षा दिल्यानंतर मित्रांसोबत फिरायला गेलेल्याल्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
बारावीची परीक्षा दिल्यानंतर मित्रांसोबत फिरायला गेलेल्याल्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
महा घडामोडी न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारावीची परीक्षा दिल्यानंतर संबंधित विद्यार्थी आपल्या अन्य काही मित्रांसोबत कासारासाई धरण परिसरात फिरायला गेले होते. याठिकाणी गेल्यानंतर दोन जणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अचानक तोल गेल्याने दोघेही पाण्यात पडले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मित्रही त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत.
दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. आरिष घोगी (17, सोमाटणे फाटा) आणि विनय किसन कडू (17, रा. निगडी, मूळगाव येळसे ता. मावळ) अशी मृत पावलेल्या दोन विद्यार्थ्यांची नावं आहेत. शिरगाव परदंवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणारे सहा मित्र बारावीची परीक्षा दिल्यानंतर कासारसाई धरण परिसरात फिरायला गेले होते.
धरण परिसरात फिरायला गेले असता उन्हाचा चटका वाढल्याने सर्वजण धरणात पोहोण्यासाठी उतरले. यावेळी आरिष आणि विनयचा अचानक तोल गेला आणि दोघं खोल पाण्यात पडले. त्यांच्या इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपयोग झाला नाही. उपस्थित विद्यार्थ्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या शिरगाव परदंवडी पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचा धरणाच्या पाण्यात शोध घेतला.
दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह आढळले आहेत. फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिरगाव परदंवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. परीक्षेला गेलेल्या विद्यार्थ्यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत