मनपातर्फे वर्षभरात ७१९९ किलो प्लास्टिक जप्त
उपद्रव शोध पथकाची कामगिरी : ३९ लाख रुपयांचा दंड वसूल
महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर ; नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मागील आर्थिक वर्षात (२०२१-२०२२) ७१९९ किलो प्लास्टिक जप्त करून ३९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मनपा प्रशासक आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी ही कामगिरी केली आहे.
जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्वाधिक ३२३३ किलो प्लास्टिकची जप्ती जानेवारी २०२२ मध्ये करण्यात आली होती. या आर्थिक वर्षात मनपातर्फे १४१२३ दुकानांची तपासणी करण्यात आली आणि ७५३ केसेस नोंद करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. मनपाचे उपद्रव शोध पथक आठवडी बाजार, इतर बाजारांमध्ये प्लास्टिकचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे काम करतात. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२१ मध्ये ५०४ दुकानांची तपासणी करून १ लाख रुपयांचा दंड वसूल करीत ११६ किलो प्लास्टिक जप्ती करण्यात आली. मे २०२१ मध्ये १४९ दुकानांची तपासणी करून १५ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.
जुन २०२१ मध्ये ५०४ दुकानांची तपासणी करून ११२ किलो प्लास्टिक जप्तीसह ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. जुलै २०२१ मध्ये ६६ किलो प्लास्टिक जप्त करून १.१० लाख रुपये दंड वसुली करण्यात आली. ऑगस्ट २०२१ मध्ये १३२० दुकानांची तपासणी करून ५४२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि २.८० लाखाचा दंड आकारण्यात आला. सप्टेंबर मध्ये १५१४ दुकानांची तपासणी करून १३६६ किलो प्लास्टिक जप्त केला आणि ३.९० लाखाचा दंड वसूल केला.
ऑक्टोबर महिन्यात १७७१ दुकानाची तपासणी करून ३५२ किलो प्लास्टिक जप्त केला आणि ५.४० लाखाचा दंड केला. उपद्रव शोध पथकाने नोव्हेंबरमध्ये १७५३ दुकानांची तपासणी करून ३८७ किलो प्लास्टिक जप्त करून ६.१५ लाखांचे दंड वसूल केले. डिसेंबरमध्ये १७०२ दुकानांची तपासणी करून ३५३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व ५.५० लाख रुपये दंड वसूल केला.
पथकाने जानेवारी २०२२ मध्ये १४०२ दुकानांची तपासणी करून ३२३३ किलो प्लास्टिक जप्त केला. फेब्रुवारीमध्ये १३३० दुकानांची तपासणी करून २५९ किलो प्लास्टिक जप्त केला आणि ३.३९ लाखाची दंड वसुली केली. मार्चमध्ये शोध पथकाने १४८६ दुकानांची तपासणी करून ३८५ किलो प्लास्टिक जप्त करून ४.३५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत