Breaking News

14 एप्रिल पासून जिल्ह्यात कार्यालयांना डिजिटल व्यासपीठ मिळणार

14 एप्रिल पासून जिल्ह्यात कार्यालयांना डिजिटल व्यासपीठ मिळणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा शुभारंभ

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एका क्लिकवर

जिल्हा प्रशासनातील डिजिटल क्रांतीची सुरुवात


महा घडामोडी न्युज नेटवर्क, नागपूर : गतीशील डिजिटल काळात एका क्लिकवर जनतेला आपल्या न्याय हक्काचा योजना लाभ, मोबदला व प्रमाणपत्र मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात पुढाकार घेतला आहे. राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर जिल्ह्याच्या ज्या विभागाला डिजिटल प्लॅटफार्म उपलब्ध नाही त्या सर्व विभागांना नव्या तंत्रज्ञानात सामावून घेणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा शुभारंभ 14 एप्रिल रोजी होणार आहे. 

डिजिटल युगाच्या काळात नागपूरकर जनतेला सर्व शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात सहज व सुलभतेने लाभ मिळावा, यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनाला ही डिजिटल क्रांती नागपूरकर जनतेला जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकार्पित होणार आहे.

       जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन सहज सुलभ व जलद न्यायाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजनांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी मिळेल. अनेक विभाग डिजिटल व्यासपीठावर सध्या कार्यरत आहे. स्वत:च्या वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र आता जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे असा तंत्रज्ञानाचा पाया नाही त्यानांही ही सुविधा देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. नव्या वेबसाईटच्या माध्यमातून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्धतेची माहिती देखील या होणार आहे.

     पालकमंत्री डॉ.नितीन राऊत 14 एप्रिल रोजी या योजनेची सुरुवात करणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने 14 एप्रिल रोजी या संदर्भात एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येत आहे.

        www.mahabany.in या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. पोर्टल कसे वापरावे यापासून तर सहज, सुलभ आणि सरळ त्रिसूत्रीचा वापर करून या ठिकाणी विविध योजनांचा लाभ सामान्यातल्या सामान्य ग्रामीण नागरिकांना देखील घेता यावा अशा पद्धतीने हे पोर्टल बनवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत या पोर्टलवर करण्यात आलेल्या अर्जाला विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याचे धोरण असून याची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही योजनेसाठी लाभासाठी करण्यात आलेला अर्ज विशिष्ट कालमर्यादेत संबंधित विभागामार्फत पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.

       अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट सोबत या नव्या डिजिटल व्यासपीठाचा समन्वय असेल. त्यामुळे अस्तित्वात असणाऱ्या वेबसाईट सोबतच शासनाच्या ज्या विभागाच्या वेबसाईट नाहीत, त्या विभागाच्या योजनांना देखील यामुळे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायासाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीय जनतेच्या जगण्याला आधार दिला, दिशा दिली त्यांच्या याच ध्येय धोरणांना दृष्टीपथा समोर ठेवून ही योजना आम्ही नागरिकांकरिता सुरू केल्या आहेत.

अनेकदा या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत लोकांना या योजनांची माहितीच मिळत नाही मिळाली तरी त्याचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षता येत नाही. त्यामुळे योजनेची उद्दिष्ट साध्य होत नाही आणि ज्यांच्या साठी हा सगळा घाट घातलेला असतो ते या सगळ्या योजनांच्या लाभापासून वंचितच राहतात म्हणूनच कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी हि योजना आम्ही घेवून आलो आहोत.

तसेच विविध व्यवसायांना महाराष्ट्रातील योजनांचा योग्य लाभ मिळावा आणि या व्यवसायातून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या साठीही प्रयत्नशील आहोत. हे सगळे करत असताना सामाजिक जाणिवांचा देखील विचार करणे महत्वाचे असते एव्हढेच नव्हेतर नवीन व्यवसाय सुरू करणार्यांना देखील येथे योग्य मार्गदर्शन मिळून महाराष्ट्रातील अनेक योजनांचा लाभ घेता यावा.

याच सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही या योजना अत्यंत सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत कश्या पोहचतील याचा विचार करून पाऊल उचलले आहे. जेणे करून लोकांनी लोकांसाठी सुरू केलेल्या या शासनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होवून खऱ्या अर्थाने शासन हे सुशासन ठरु शकेल.

या योजना नक्कीच प्रत्येक भारतीयांसाठी जगण्याचा आधार बनतील व सोबतच त्यांच्या भविष्याला दिशा देण्यास ही सहाय्यक ठरतील ज्या महापुरुषांच्या नावाने या व अन्य योजना आहेत त्या नक्कीच त्यांच्या कर्तुत्वाला साजेशा ठरतील यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत.
 
श्री. नितीन राऊत, ऊर्जा मंत्री

                                                                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत