Breaking News

हेटी नांदगाव येथील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा

 

हेटी नांदगाव येथील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा

शिवसेना महिला आघाडीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन


महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव येथे गावात पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने नाल्यात खड्डा करून ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. त्यामुळे तातडीने पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने चंद्रपूर पाणी पुरवठा विभाग, मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव येथे पाण्याची गंभीर समस्या आहे. गावात पाणीच नसल्याने तेथील तरुणांना मुलगी द्यायला तयार नाही. या पाण्याच्या समस्येबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा कानाडोळा केला जातो. ह्या गंभीर समस्येची माहिती मिळताच शिवसेना विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे, जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. उज्वला नलगे यांनी काही दिवसांपूर्वी गावाला भेट देत महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. 

या गंभीर समस्येबाबत आपण पाठपुरावा करून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार हेटी नांदगाव येथील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी सौ. उज्वला नलगे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर पाणी पुरवठा विभाग, मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने पाण्याचा विषय गांभीर्याने घेऊन सोडविला नाही तर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

शिष्टमंडळात शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे, कुसुमताई उदार, विक्रांत सहारे, विनय धोबे, विकास विरुटकर, श्रुती घाटे, विद्या ठाकरे, ज्ञानेश्वर लोणगाडगे, सद्दाम कनोजे, चेतन कामडी, सुष्मित गौरकार, रोहन नलगे,  शुभम घागरगुंडे, भास्कर ठावरी, आकाश पावडे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत