भीमराव रामजी आंबेडकरांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर घडविणारी त्यागमय स्फुर्ती:- आई रमाई
भीमराव रामजी आंबेडकरांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर घडविणारी त्यागमय स्फुर्ती:- आई रमाई.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज संपुर्ण जगात जगविख्यात आहे. जगातील सामाजिक, कामगार, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, अनुवंशिक अशा सर्वांग विचाराचे तज्ञ म्हणुन बाबासाहेबांची ख्याती आहे. अशा महान विश्वरत्न असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यात ज्यांच्या संपुर्ण जिवनाचा त्याग आहे त्या आहेत आई रमाई.
भीमराव आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यानंतर अगदी थोड्याच दिवसात त्यांची आई भीमाबाई मरण पावली. त्यानंतर सुभेदार रामजीबाबांनी जिजाबाईशी दुसरे लग्न केले परंतु बाल भीमराव आणी जिजाबाईचे फारसे पटले नाही. बाल भीमरावांचा सांभाळ त्यांची आत्या मीराबाई जिवाभावाने करीत होती. भीमराव आत्याचा खुप लाडका होता. भीमराव हा खोडकर परंतु अभ्यासात हुशार होता. त्यांनी 1904 ला इंग्रजी माध्यमातुन चौथी पास केली. त्यानंतर एल्फिंस्टन स्कुल मध्ये हायस्कुलसाठी प्रवेश घेतला.
इयत्ता दहाविला असतानाच त्यावेळच्या चालीरितीप्रमाणे सुभेदार रामजीबाबाने भीमरावांचे लग्न करण्याचे ठरविले आणि भिमरावासाठी वणंदच्या भिखु धुत्रे वालंगकरच्या सुंदर व सुशील रमाला पसंद केले आणी 1906 ला भीमराव आणी रमाईचा विवाह झाला. त्यावेळी भीमराव मॅट्रीक सुध्दा पास झालेले नव्हते. आजच्या किंवा त्याकाळच्या इतर नववधुप्रमाणे रमाई वागली असती व भीमरावांना संसारात गुरफटुन ठेवले असते तर कदाचित भीमराव मॅट्रीक सुध्दा पास झाले नसते. इथुनच रमाची संसाराची आणी पतिच्या कार्यात सहकार्य करण्याची कसोटी सुरु झाली.
रामजीबाबाची प्रेरणा व रमाईच्या त्यागाने 1907 ला भीमराव मॅट्रीक उतीर्ण झाले. त्यानंतर 1910 ला इंटर पास झाले. 1912 ला बि ए पास झाले. त्याचवर्षी त्यांच्या सांसरिक जिवनात यशवंत नावाचे फुल उमलले. या संसार आणि शिक्षण या दोन नावेवर सवार होउन वडीलाच्या इच्छेनुसार उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळालेल्या शिष्यवृतीच्या अटीनुसार बडोद्याच्या महाराजाकडे कार्यरत असताना 1913 रोजी रामजीबाबाचे निधन झाले. बाबासाहेबांचा मोठा आधार हरवला त्यामुळे कुटुंबाची जी जबाबदारी रामजीबाबा घेउन कुंटुब सांभाळत होते ती जबाबदारी आता अल्पवयीन असलेल्या रमाईवर आली. परंतु रमाईने कधीही आपला धीर खचु दिला नाही.
रामजीबाबाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, भीमरावाच्या उच्च शिक्षणासाठी जो त्याग करावा लागेल त्यासाठी ती तयार झाली. ती तयारच झाली नाही तर भीमरावांच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करु लागली. पुढे भीमराव परदेशात उच्च शिक्षण घेउन डाॅक्टरेट मिळविली, यात भरल्या घराला शेणाच्या गोवर्या विकुन सांभाळणार्या रमाचा वाटा हा सिहांचा वाटा आहे. भीमरावांचे सुध्दा रमावर अतिशय प्रेम होते, ते आवडीने त्याना रामु म्हणत होते, तसाच ते पत्रात सुध्दा उल्लेख करीत होते. ही रामु भीमरावाच्या प्रत्येक कार्यात आपल्या त्यागाची झलक दाखवित होती.
एकदा छत्रपती शाहु महाराज भीमरावांना त्यांच्या घरी भेटावयास येतात. त्यावेळी बरीच पंचाईत झालेली असते. जरी भीमराव उच्च शिक्षित असले तरी आर्थिक तंगीमुळे रमाईला अगदी फाटक्या कपड्यात दिवस काढावे लागत होते. अशातच शाहु महाराज घरी आल्याने आपण काय नेसावे हाच रमाईजवळ प्रश्न होता, परंतु यातुनही तीने या गोष्टीचा बाउ न करता छत्रपती शाहु महाराजाने भीमरावाच्या सत्कारात दिलेल्या फेट्याचे कापड लुगडे बनवुन नेसले. ही बाब भीमराव आणी छत्रपती शाहु महाराजांच्याही लक्षात आली.
असेच एकदा मुलांच्या वसतीगृहाला भेट दिली तेव्हा वसतीगृहातील मुले जेव्हा उपासी असलेली रमाला आढळली त्यावेळी आपल्या जवळील दागीने गहाण ठेउन मुलांच्या जेवनाची सोय करण्यासाठी दिले. स्त्रि आणी दागीना हा किती मोह असतो, हे सर्वांना माहीत आहे. परंतु रमाने दागीण्याचा मोह न ठेवता मुलांच्या उपासाला आपला मोह बनविला. आजच्या काळात अशी स्त्रि शोधुनही मिळणार नाही. भीमरावाच्या कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी रमाई मोठ्या समर्थपणे, त्यागाने आणी हिम्मतीने सांभाळीत होती.
कुंटुबही छोटे होते असे नाही तर कुंटुबात सासु जिजाबाई, भीमरावाची अात्या मीराबाई, रमाईची मोठी जाउ लक्ष्मीबाई, पुतण्या मुकुंद आणी मुलगा यशवंत. एवढ्या मोठ्या परीवाराचा गाडा समर्थपणे चालवुन भीमरावांना त्यांच्या कार्यात चिंतामुक्त ठेवत होती. भीमराव आणी रमाईची चार अपत्ये गंगाधर, रमेश, राजरत्न आणी मंजुळा ही उपचाराअभावी मरण पावली तरीसुध्दा या मातेने कधीही धीर सोडला नाही.
रमाईच्या काळातच भीमरावांनी मोठमोठी आंदोलने केली साउथबरो कमीशनची साक्ष असो की गोलमेज परिषद असो, महाडचा सत्याग्रह असो की नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असो. या सगळ्या कार्यात भीमरावाची स्फुर्ती बनुन रमाई साथ देत होती.
या सगळ्या आंदोलनामुळे सरकार आणी तत्कालीन काँग्रेस आणि हिंदु संघटने दुखावल्यामुळे भीमरावांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. हे पाहुन रमा सतत चिंतेत राहायची, या चिंतेमुळेच त्यांना बिमारीने ग्रासले आणि दिवसेदिवस त्या खंगत चालल्या होत्या. अशातच त्या एकेदिवशी भिमरावाजवळ पंढरीच्या दर्शनाला जाण्याची मागणी करतात. भीमराव रमाईना अतिशय मार्मिक उतर देतात, जो विठोबा आपल्याला दर्शन देत नाही त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला जाण्यात काय अर्थ आहे. आपण असे एक नविन पंढरपुर बनवु ज्यात कोणालाही येण्याची मनाई राहणार नाही.
दुर्दैव हे की रमाई ते नविन पंढरपुर (नागपुर) पाहण्यासाठी जिवंत राहील्या नाही. रमाईचे त्या दीर्घ आजारानेच दि. 27 मे 1935 ला निधन झाले. रमाईच्या निधनाने भिमराव अगदीचे खचुन केले. लहान मुलासारखे ओक्साबोक्सी रडत होते, रमाईविषयी आपल्याशी स्वगत बडबडत होते. रमाईच्या निधनानंतर भीमरावांचे कोणत्याच कार्यात मन लागत नव्हते. ते स्वतःला एका खोलीत बंद करुन घेतले, कोणत्याही कार्यकर्त्याला भेटत नव्हते. आपल्या डोक्याचे मुंडन करुन भगवे वस्त्र धारण करुन एका वैराग्याचे रुप धारण केले होते. या रुपाला पाहुनच जनतेने त्यांना बाबासाहेब बोलने सुरु केले.
अशाप्रकारे रमाईच्या सार्थ त्यागाने भीमराव रामजी आंबेडकर डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणुन नावलौकीक झाले. रमाईच्या निधनानंतर त्यांनी असा निश्चय केला की मी उभ्या आयुष्यात कधीही दुसरे लग्न करणार नाही. ही रमाईवर असणार्या प्रेमाची पावती आहे. त्यानंतर जवळपास 13 वर्षे बिना पत्नीने घालविले. याच काळात ब्रिटीश सरकारमध्ये मंत्रि झाले,
याच काळात ते भारतीय संविधान बनविणार्या संविधानसभेमध्ये निवडुन गेले, याच काळात भारत स्वतंत्र झाला, याच काळात स्वतंत्र भारताची घटना बनविण्याची जबाबदारी आली परंतु त्यांना या काळात कधीही दुसर्या लग्नाची आवश्यकता भासली नाही. कारण रमाईचे प्रेम, त्याग आणि स्नेह हा सतत बाबासाहेबांच्या सोबत होता.
रमाईच्या निधनाच्या बर्याच दिवसानंतर बाबासाहेबांनी सामाजिक कार्यास पुन्हा सुरुवात केली. यावेळी रमाईला वचन दिलेले पंढरपुर बनविण्याचा ध्यास घेउनच. याचवर्षी बाबासाहेबांनी येवले मुक्कामी झालेल्या परीषदेत गर्जना केली की, ' मी हिंदु म्हणुन जन्मलो याला माझा नाईलाज आहे परंतु हिंदु म्हणुन कदापि मरणार नाही '. या नंतर सर्व धर्माच्या संस्थानी त्यांना रिझविण्यासाठी आमंत्रणे पाठविली, आमिषे दाखविली परंतु गुरुवर्य केळुस्करांने दिलेल्या ' बुध्दचरीत ' या ग्रंथाने प्रभावित झालेल्या बाबासाहेबांनी विजयादशमी दिनी 14 आॅक्टो. 1956 ला बौध्द धम्माची दिक्षा नागपुरला घेउन रमाईचे नविन पंढरपुर बनविण्याचे वचन पुर्ण केले.
- सी पी उराडे,समता सैनिक दल, HQ दीक्षाभुमी नागपुर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत