जिवती तालुक्यात भ्रष्टाचाराच्या बोलबाला
कंत्राटदारासोबत अभियंत्याची हिस्सेदारी ?
जलजीवन मिशनच्या कामावर कोट्यावधी रुपयाचा चुराडा
मात्र अनेक कामे निकृष्ट दर्जाचे
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर/जिवती : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जल जीवन मिशनचे कामे ठप्प झाले आहे.जिवती तालुका हा अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भाग असून या तालुक्यात जल जीवन मिशन या योजनेच्या च्या माध्यमातून तालुक्यात नळ योजनेचे कामे सुरू आहेत. हे कामे शासनाने अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेट) करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.
परंतु जिवती तालुक्यातील कोणत्याच गावातील नळ योजनेचे कामे हे नियमानुसार व अंदाजपत्रकानुसार कामे झालेली नाही. संबंधित विभागाच्या डेप्युटी इंजिनियर, इंजिनीयर यांच्याशी संवाद साधला असता तर त्यांचे असे म्हणणे आहे की तुम्ही आम्हाला तालुक्यातील चार गाव निवडून द्या आम्ही त्या गावाला भेट देऊन जल जीवन मिशनच्या कामाची चौकशी करू. तालुक्यातील जनतेचे म्हणणे असे आहे की जेव्हा कामाच्या लेआउट देण्यात येते त्या दिवसापासून प्रत्येक कामावर त्या विभागाचा इंजिनीयर भेट देतो कामाची प्रगती कशी सुरू आहे. याची वारंवार भेट देऊन माहिती घेत असते.
तालुक्यातील सुज्ञ नागरिकांचे म्हणणे असे आहे की ज्यावेळी संबंधित इंजिनिअरने कामावर भेट दिली तर त्या इंजिनियर कडे प्रत्येक भेटीचे फोटो व्हिडिओ आणि त्यांनी आपल्या डायरी मध्ये कामाची नोंद घेतली असेल ना मग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकाराकडून पुरावे मागण्याची काय गरज आहे. संबंधित इंजिनीयरला व कंत्राटदाराला वाचण्याच्या प्रयत्न होत नसणार ना? अशी शंका निर्माण झाली आहे. पाण्याच्या टाकीचे बेसमेंट (पाया) हे १६ एम.एम व १२ एम.एम चे लोखंडी राड वापरून काम करायला पाहिजे होते परंतु तसे न करता तालुक्यातील ज्या गावात जल जीवन मिशनचे पाणीचे टाकीचे कामे झाली आहे.
त्या सर्व टाकीच्या बेसमेंट पायामध्ये१२ एम.एम व १० एम.एम स्टील वापरून बेस्मिटचे बांधकाम केले असल्याची गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.नळ योजने करिता पाईपलाईन ही१मीटर खोल जमिनीमध्ये टाकायचे आहे.ती कुठे २ फूट तर कुठे दीड फूट खोदकाम करून पाईपलाईन टाकलेली आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण, काँक्रीटकरण वळण रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. त्या ठिकाणी काँक्रीट करायचे आहे ते केलेले कुठेही दिसत नाही. रायझिंग करणे खोदकाम करणे खडक असेल त्या ठिकाणी ब्लास्टिंग करणे व खोली१ मिटर खोदकाम करणे हे सर्व अंदाजपत्रकानुसार करायचे आहे.परंतु खोदकाम कमी केलेले असल्याचे बोलले जात आहे.
विहिरी पासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिंगल ६ केजी चा अखंड काळा पाईप टाकने अनिवार्य आहे. परंतु काही ठिकाणी २० फूट लांबीचे ४ केजी चे बारीक पाईप टाकले आहेत. या काळ्यापायपाची प्रेशर मशीन ने टेस्टींग करावे लागते तालुक्यातील एकाही कामाची प्रेशर मशीनने टेस्टिंग केलेली नाही. प्रेशर मशीन टेस्टिंग केली असेल तर एखादा पुरावा संबंधित विभागाने द्यावा अशी जनतेची मागणी आहे.नियमानुसार विहिरीचे खोदकाम ५० फुट करणे आणि तसेच काँक्रीट वॉल ५० फूटच्या वर करणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता
खडकापासून वर १५ ते २० फुट बांधकाम केले असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून विहिरीमध्ये ४ ते ५ आडवे बोर मारणे गरजेचे असून सुद्धा तालुक्यातील एकाही विहिरीत आडवे बोर मारले नसल्याची खात्रीलायक माहिती असल्याची चर्चा सुरू आहे. पाण्याच्या टाकी पासून जवळच म्हणजे गावाला लागून विहिरीचे खोदकाम करायला पाहिजे होते. परंतु तसे न करता ठेकेदाराच्या फायद्यासाठी याची लांबी वाढवलेली आहे. प्रत्येक घरा समोर सिमेंट काँक्रीटचे प्लॉट फॉर्म तयार करून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे नळ लावून देणे असून सुद्धा प्लॅटफॉर्म न बनवता नळ जोडणी केली आहे. हलक्या दर्जाच्या नळाच्या पाईप वापरण्यात आला आहे.
अंदाजपत्रकामध्ये त्या नळाच्या पाईपचे कुठेही नोंद नाही. विहीर खोदकाम करण्या अगोदर त्या ठिकाणी टेस्टिंग बोरवेल मारून ते पाणी टेस्टिंग साठी पाठवायचे होते. परंतु ते नियमानुसार टेस्टींगला पाठवलेले नाही. हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसण्याचे काम असून सुद्धा तालुक्यातील जनतेच्या डोळ्यात माती झोकण्याचे काम कंत्राटदाराने व पाणीपुरवठा विभागाच्या इंजिनिअरने केले असल्याचे बोलले जात आहे. पिण्याचे पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या बांधकामात माती मिश्रित रेती तसेच हलक्या दर्जाचे सिमेंट लोखंडी राड कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे.
अंदाजपत्रकानुसार जलजीवन मिशन अभिमान अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च झाला असला तरी एकाही गावात नळ योजनेचे कामे पुर्ण झाले नाही. अनेक अपूर्णच कामे असल्याने ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामे रेंगाळली आहे. त्यामुळे या योजनेने सामान्य माणसाची तहान भागवलीच नाही. हर घर नल हर घर जल घोषणा करूनशासनाने मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन या अभियानाची सुरुवात मोठ्या थाटामाटात केली,मात्र कंत्राटदार व संबंधितअधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित राहिले.
"एकच कंत्राटदार पाणीपुरवठा विभागाचा जावई झाला का त्याला झुकते माप देण्यात आले आहे. जिवती तालुक्यातील जवळपास ३० गावातील जल जीवन मिशन योजनेचे कामे एकाच कंत्राटदाराला देण्यात आले असून ई-निविदा प्रक्रियेत त्याच कंत्राटदाराला कशी कामे मिळाली. असा प्रश्न तालुक्यातील जनते कडून विचारले जात आहे. आता त्या कंत्राटदाराने ज्याला कामाचा अनुभव नाही अशा व्यक्तीला काम देऊन दर्जाहीन कामाचा सपाटा सुरुवात करण्यात आले आहे. तो पाणीपुरवठा विभागाचा कंत्राटदार लाडका जावई कोण याची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे"
या योजनेअंतर्गत प्रतिदिन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे मात्र आजघडीला तालुक्यातील एकाही गावात ५५ लिटर तर सोडाच लिटरभरही पाणी मिळाले नाही.
जिवती तालुक्यातील गावात, गुड्या, पाड्यात,वाड्यात, तांड्यात, वस्त्यात प्रत्येक ठिकाणी जलजीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून कामे मंजूर व सुरु आहेत, मात्र एकाही गावात हि योजना यशस्वीपणे राबविण्यात आली नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.आतापासूनच माणिकगड पहाडावर पाण्याची टंचाई भासत असल्याचे बोलले जात आहे. कुठे विहीर, कुठे पाण्याची टाकी तर कुठे पाईपलाईनचे काम रखडल्याने योजना सपशेल फेल ठरल्याचे विदारक वास्तव पहाडावर पहावयास मिळत आहे. जिवती तालुक्यात जल जीवन मिशनच्या कामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन निकृष्ट बोगस दर्जाच्या कामाची पाहणी करून संबंधित कंत्राट दारावर व इंजिनियर वर गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी होत आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून स्वतःचे हात ओले केल्याची खमंग चर्चा सुरू असून. ओले हात करून घेतल्यामुळे. कंत्राट दाराकडून थातूरमातूर कामे करून घेतली व बिले अदा करून कमिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची माया गोळा केली असल्याचे बोलले जात आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यातील अनेक गावातील विहीरींनी तळ गाठला, हातपंपही कोरडे पडले आहेत, घोटभर पाण्यासाठी महिलांना भटकावे लागत आहे.जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनच्या कामासाठी निधीच नसल्याचा कांगावा करत अधिकारी हात वर करत आहेत, कंत्राटदारांनीही संधीच्या फायदा घेऊन लोकांना वाऱ्यावर सोडले आहे.या कामाकडे पाठ फिरवली असून यंदाही उन्हाळ्यात हि योजना नागरिकांची तहान भागवणार की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.
हपापलेल्या कंत्राटदारांनी ऑनलाइन निवीदा प्रक्रियेतून अनेक कामे आपल्या नावे करून घेतली मात्र एकाही कंत्राटदाराने काम पुर्ण केले नसल्याचे आढळून आले आहे.परिणामी जिवती तालुक्यातील नागरिकांचा घसा कोरडा अन् घागर रिकामिच, योजना रखडलेल्या असून तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नळ योजनेचे कामे ही नियमानुसार केलेली नसून धातूमातून कामे करून ठेकेदारांनी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून बिले काढलेली चर्चा सुरू आहे.
म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य गावातील प्रतिष्ठ नागरिक यांच्यासमोर योग्य चौकशी करावी संबंधित ठेकेदाराकडून राहिलेल्या अर्धवटे कामे करून घ्यावी लोकांची तहान भागवावी. राजुरा विधानसभा क्षेत्रातील आमदार देवराव दादा भोंगळे यांनी लक्ष द्यावे जिवती तालुक्यातील जल जीवन मिशनचे अर्धवट कामे राहिलेले आहे. पाणीपुरवठा विभागाला अर्धवटे कामे पूर्ण करण्याची सूचना द्यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत