Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत – मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत – मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांसह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे वाहनधारक, रुग्णवाहिका, शालेय बस, शासकीय व निमशासकीय वाहने आणि सर्वसामान्य नागरिक यांना प्रचंड अडथळ्यांचा व त्रासाचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून जीवितहानीही नाकारता येणार नाही, असे नमूद करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, रस्त्यावरील हे खड्डे तातडीने बुजवावेत.

ही मागणी मनसेचे जिल्हा सचिव श्री. किशोर मडगुलवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. कुलदीप चंदनखेडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, शहर व जिल्ह्यातील रस्त्यांची पाहणी केल्यावर दिसून आले की, सर्वत्र पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. नागरिकांचा जीव धोक्यात येण्याआधी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागांना त्वरीत निर्देश द्यावेत. तसेच, खड्डे बुजवण्याच्या कामाची तातडीने अंमलबजावणी करून त्याचा अहवाल लेखी स्वरूपात देण्यात यावा.

शिष्टमंडळात उपस्थित प्रमुख पदाधिकारी :

निवेदन देताना मनसेचे जनहित कक्ष जिल्हा उपाध्यक्ष विजय तुरक्याल, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते, वाहतूक सेना अँटो संघटनेचे शहराध्यक्ष असलम खान, मनसे शाखाध्यक्ष बंडू पेंदाम, कार्यकर्ते मंगेश आडे आणि इतर मनसैनिकही उपस्थित होते.

मनसेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आलेली ही मागणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत