महाराष्ट्र विधानमंडळाचे यावर्षाचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतचं 3 मार्च 2022 पासून सुरु होणार
महाराष्ट्र विधानमंडळाचे यावर्षाचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतचं 3 मार्च 2022 पासून सुरु होणार
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईत घेतलं गेलं होतं. खरंतर हिवाळी अधिवेशन हे नागपुरात भरविण्याची जुनी परंपरा आहे. पण मुख्यमंत्री यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना विमानप्रवास करता येणार नव्हता. त्यामुळे हिवाळी अधिवेशन हे अखेर मुंबईला घेतलं गेलं. त्यावेळी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपुरात भरवलं जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा होती. पण हे अधिवेशन नागपूरला होणार नसून पुन्हा मुंबईतच भरवलं जाईल, असं सरकारडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सरकारकडून अधिवेशनाचा वेळ आणि कालावधी देखील जाहीर झाला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत
महाराष्ट्र विधानमंडळाचे यावर्षाचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च 2022 पासून सुरु होणार असून 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे, असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्प 11 मार्चला सादर करण्यात येणार
2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहे. त्यांना डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ते अधिवेशनासाठी नागपुरला जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरविण्यात येणार आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर आता भाजप आक्रमक होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत