Breaking News

धानाला बोनस आणि थकीत चुकारे त्वरित द्या, भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

धानाला बोनस आणि थकीत चुकारे त्वरित द्या, भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


महा घड़ामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधि संतोष रोकड़े, अर्जुनी मोरगाव ;  पूर्व विदर्भातील धान 
 शेतकऱ्यांना खरीप हंगामात मिळणारा बोनस महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मिळाला नाही. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील संपूर्ण पिक धान खरेदी केंद्रावर विकला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळाले नाही.मार्चअखेरपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज परतफेड करायचे असते. शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आणि बोनस सरकारने दिला नाही.अशा परिस्थितीत घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी? हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांचे खरिपातील बोनस आणि धानाचे थकीत चुकारे त्वरित मिळावे, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळावा या मागणीसह तालुका भाजपच्या वतीने आज तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.

         भाजपच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांना दरवर्षी बोनस दिला जात होता.धानाचे चुकारे वेळेवर होते. त्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेआणि धान उत्पादक शेतकऱ्यांचा छळ सुरू झाला. शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आणि बोनस मिळाला नाही. यामुळे शेतकरी देशोधडीला लागून अडचणीत सापडला आहे.एकीकडे शेतीसाठी घेतलेले कर्ज परतफेड करण्याची मुदत संपत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाचे दाम अद्यापही मिळाले नाही.

शेतकऱ्यांनी हे कर्ज फेडायचे कुठून? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांची विपरीत परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी.महा विकास आघाडी सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा होती. प्रत्यक्षात मात्र या घोषणेचा कुठल्याही शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावा या मागण्यांसह तालुका भाजपाच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर,प्रदेश सदस्य रचना गहाणे,रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, विजय कापगते, होमराज पुस्तोडे, नुतनलाल सोनवणे, डॉ. गजानन डोंगरवार, डॉ. नाजूक कुंभरे,विनोद नाकाडे,व्यंकट खोबरागडे,संदीप कापगते,इंदु लांजेवार,मीना शहारे ,गीता ब्राह्मणकर ,खुशाल काशिवार, प्रेमलाल नारनवरे ,काशिनाथ कापसे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत