आणखी एका आरोपीस अटक; मकरधोकडा येथील वाघाचे मृत्यू प्रकरण
आणखी एका आरोपीस अटक; मकरधोकडा येथील वाघाचे मृत्यू प्रकरण
महा घड़ामोडी न्यूज नेटवर्क नागपुर : उत्तर उमरेड परिक्षेत्रातील मकरधोकडा मार्गालगतच्या झुडपात करंट लावल्याने मृत्यू झालेल्या वाघाच्या प्रकरणात आणखी एका आरोपीस वनविभागाने अटक केली आहे. लिलाधर लक्ष्मण मोहरकर (५७, रा. बुधवारी पेठ, उमरेड) असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी ही अटकेची कारवाई करण्यात आली. लिलाधर मोहरकर याने घटनास्थळाला लागूनच असलेली शेती ठेक्याने केली आहे. मोहरकर याने अन्य आरोपी भैयालाल जंगलू दरसिम्हा, रा. रामपूर यास विद्युत प्रवाह लावण्यास सांगितले होते व वन्यप्राण्यांची शिकार करण्यास प्रवृत्त केले होते.
मोहरकर याला उमरेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे आरोपीचा जामीन मंजूर केला. सदर कारवाई नागपूर (प्रा.) मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. के. मडावी, बी. व्ही. लोणारे, जे. एन. कामडी, मंगेश कोरे, योगेश अंबझिरे, सागर चावट, अलका रोहाड, वासुदेव ठाकरे, विठ्ठल चौधरी आदींनी पार पाडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत