किरकोळ वादावरून चाकूहल्ला तरुण गंभीर जखमी
किरकोळ वादावरून चाकूहल्ला तरुण गंभीर जखमी
आमघाट येथील घटना
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बेला : लग्नसमारंभात गेलेल्या एकाच गावातील दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद उद्भवला. हा वाद विकोपास जाताच एकाने दुसऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमघाट येथे रविवारी (दि. २४) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
कमलाकर वसंत येसनसुरे (२९) असे जखमीचे तर लक्ष्मण दिलीप ताडाम (३२) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही आमघाट, ता. उमरेड येथील रहिवासी असून, त्यांची आपसात ओळख आहे. आमघाट येथील एका तरुणाचे वडोदा येथे लग्न असल्याने दोघेही लग्नाला गेले होते. त्या लग्नात दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले.
वाद मिटल्यानंतर दोघेही वरातीसोबत एमएच-३१ / बीएन- १९३० क्रमांकाच्या झायलोने आमघाट येथे परत आले. कमलाकर झायलोतून खाली उरताच लक्ष्मणने चिडून त्याच्या पाठीमागे कंबरेवर चाकूने वार केला. कमलाकर वळताच लक्ष्मणने त्याच्या दोन्ही हात व छातीवर चाकूने वार केले.
यात कमलाकर गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला लगेच बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी बेला पोलिसांनी भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी लक्ष्मणला अटक केली.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत