Breaking News

आता ताडोबा व्याघ्र प्रकल्प होणार गावमुक्त!

आता ताडोबा व्याघ्र प्रकल्प होणार गावमुक्त!

रानतळोधीची जंगलातील शेवटची दिवाळी

कोळसा गावाचे पुनर्वसन एका महिन्यात

बफरचे उपसंचालक जी.गुरुप्रसाद यांची महत्त्वाची कामगिरी



महा घडामोडी न्युज प्रतिनिधी चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्र पूर्णपणे गावमुक्त व्हावे आणि वन्यजीवांसाठी रान मोकळे व्हावे, या उद्देशाने येथील सहा गावांच्या पुनर्वसनाचे काम सुरू होऊन जवळपास १५ वर्षे झालीत. तरीही अद्याप कोळसा आणि रानतळोधी ही गावे हटलेली नव्हती. प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी पुढाकार घेत या कामाला गती दिली. बफर क्षेत्राचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद यांनी अंमलबजावणी करून ते काम मार्गी लावले. आता रानतळोधीची ताडोबाच्या जंगलातील ही शेवटची दिवाळी असणार आहे. तत्पूर्वी, कोळसा गाव येत्या महिनाभरात पुनर्वसित होईल. त्यामुळे लवकरच ताडोबा प्रकल्प पूर्णपणे गावमुक्त होणार आहे.


ही अत्यंत महत्त्वाची घडामोड येत्या महिन्यातच पाहायला मिळेल. तसे हे काम सोपे नव्हते, असे सांगताना गुरुप्रसाद यांच्या चेहन्यावर समाधान जाणवले. ते म्हणाले, डॉ. रामगावकर यांच्या सक्षम मार्गदर्शनात व सहकार्याने हे शक्य होऊ शकले. अशा कामात मोठा दबाव व अडथळे येतात. पण त्यास न जुमानता डॉ. रामगावकर यांनी प्रस्ताव पाठवण्यापासून संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडेपर्यंत स्वतः लक्ष दिले.


 त्यामुळे जे काम तीन वर्षांत होणार होते, ते आम्ही अवघ्या आठ महिन्यांत पूर्ण केले. कोळसा गावाच्या पुनर्वसनाला ऑक्टोबरपासून जोरात सुरुवात केली. पुढील महिनाभरात या गावातील १४४ कुटुंबे आपल्या नव्या गावी म्हणजे सावली तालुक्यातील गोलाबुर्ज येथे जातील. तेही आनंदाने... कारण त्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत आम्ही काळजी घेतली. किंबहुना, नव्या गावाची निवड या गावकऱ्यांनीच केली होती. येत्या पावसाळ्यात ते तिकडे शेती करू शकणार आहेत. केवळ गाव वसवून दिले म्हणजे झाले, एवढीच भूमिका वनविभागाची नसते, तर महसूल आणि अन्य विभागांकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांसाठीही आम्ही समन्वय घडवून आणतो.


ताडोबातून बाहेर पडणारे रानतळोधी हे आता शेवटचे गाव असेल. एव्हाना पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावकरी तर आतापासूनच नव्या गावी म्हणजे वरोरा तालुक्यातील सालोरी येथे जाण्यासाठी घाई करीत आहेत. पण, सुव्यवस्थित पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही त्यांना


या गावाच्या पुनर्वसनासोबतच ही मोहीमही संपेल. यापूर्वी बोटेझरी (२००७), नवेगाव (२०१२). जामनी (२०१३) आणि पळसगावचे (२०१९) पुनर्वसन झाले आहे. पळसगावात आणि मेळघाटात पुनर्वसन कामाचा अनुभव आला होता. त्याचा या कामांमध्ये भरपूर फायदा झाला, असेही गुरुप्रसाद यांनी सांगितले.


धमक्यांना न जुमानता ८०० हेक्टरचे हटवले अतिक्रमण !
चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही वन क्षेत्रातील जवळपास ८०० हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण आम्ही हटवले. प्रचंड दबाव होता. पण, गेल्या दोन वर्षात या कामात सातत्य ठेवले. आधी वनजमीन शोधून मोजमाप केले, वारंवार बैठका घेतल्या, दावा सोडण्यासाठी गावकऱ्यांना समजावले, प्रसंगी गुन्हाही नोंदवला. जंगल आणि वन्यजीवांना वाचवणे आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. 


अतिक्रमण हटवलेल्या या ८०० हेक्टर जमिनीवर झाडे लावली. कारण, अतिक्रमण हटवणे आणि त्याचवेळी त्या जमिनीवर जंगल वाढवणे, हे एक समांतर काम आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ते आवश्यक आहे. अद्याप जवळपास ५० टक्के वनजमिनीवरील अतिक्रमण कायम आहे. ते हटवण्याचे काम येत्या जून महिन्यापासून हाती घेणार असल्याचा संकल्प गुरुप्रसाद यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत