Breaking News

नगरपंचायतीच्या सत्ताधारी पक्षाकडून विकास कामाबाबत पक्षपातीपणा

नगरपंचायतीच्या सत्ताधारी पक्षाकडून विकास कामाबाबत पक्षपातीपणा

महा घडामोडी न्यूज ब्युरो चीफ, दिलीप वाघमारे,सातारा : लोणंद नगरपंचायतीच्या सत्ताधारी पक्षाकडून विकास कामाबाबत पक्षपातीपणा केला जात असुन विरोधी बाकांवरील सदस्यांचे म्हणणे सर्वसाधारण सभेमधील कार्यवृत्तामध्ये घेण्यात येत नसल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे लोणंद नगरपंचायतीच्या कॉग्रेस, भाजप, अपक्ष विरोधी गटाच्या सात नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असुन नियमबाहय काम करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी ही करण्यात आली आहे.

दरम्यान,संबंधित प्रशासकीय अधिकारी व  नगराध्यक्ष यांना नियम बाह्य कृती करण्यापासून परावृत्त करावे व विकास कामांच्या बाबती मध्ये कोणतेही राजकारण न करता संपूर्ण लोणंद शहराच्या विकासाच्या बाबत निर्णय घ्यायला सांगावेत अशी मागणीही भाजपा, कॉग्रेस, अपक्ष विरोधी नगरसेवकांनी केली आहे.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक आनंदराव शेळके - पाटील, दिपाली संदीप शेळके , दिपाली निलेश शेळके, आसिया बागवान, राजश्री रविंद्र शेळके, ज्योती डोनीकर, प्रवीण व्हावळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  लोणंद नगरपंचायत येथे सत्ताधारी पक्ष व मुख्याधिकारी हे संगनमताने नियमबाह्य काम करीत आहेत.  सर्वसाधारण सभा तसेच विशेष सभा यामध्ये विरोधी बाकावरील सदस्यांच्या सूचना तथा आक्षेप यांची नोंद कार्य वृत्तामध्ये केली जात नाही, 

सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या विकास कामांच्या बाबत पूर्णपणे पक्षपातीपणा करणे व विरोधी पक्षाने दिलेल्या विकास कामांचा उल्लेख देखील कार्यवृत्तामध्ये केला जात नाही, मुख्याधिकारी यांनी सर्वसाधारण सभा तसेच विशेष सभा यामध्ये प्रशासकीय नियमांच्या अधीन न राहता विरोधी बाकांवरील सदस्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही,सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी बाकांवरील सदस्यांनी सुचवलेल्या विकासकामांच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्ष हे कायम निधीची कमतरता आहे असे उत्तर देत आहेत . मात्र सत्ताधारी पक्षाकडील सर्व विकास कामांची बहुमताच्या आधारे मंजुरी घेतली जात आहे .

कार्यवृत्त सभा झालेच्या दिनांकापासून ७ दिवसाच्या आत प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक असताना २ महिने कार्यवृत्त लिहिले जात नाही,लोणंद नगरपंचायत येथे अनुसूचित जातीसाठी दोन प्रभाग आरक्षित असताना , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनेसाठी माननीय नगराध्यक्ष यांनी स्वतःच्या प्रभागांमधील विकास कामांना सर्वसाधारण सभेची बहुमताच्या आधारे मंजुरी घेणे . अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभागाच्या दुसऱ्या प्रभागामधील कामांची कार्य वृत्तामध्ये नोंद देखील न घेणे अशी तक्रार केली आहे.

तर सत्ताधारी पक्षाच्या विकास कामांबरोबर विरोधी बाकांवरील सदस्यांची विकास कामे सुद्धा सर्वसाधारण सभेच्या कार्यवृत्त मध्ये घेऊन मंजुरी दिली जावी याबाबत  जिल्हाधिकारी  यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी व  नगराध्यक्ष यांना सूचना करावी तसेच संबंधित सभा अधीक्षक यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम ) 1981 व महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1969 नुसार जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत