दोन वर्षांनंतर मचाण गणना ; १६ व १७ मे रोजी ‘निसर्गानुभव’
दोन वर्षांनंतर मचाण गणना ; १६ व १७ मे रोजी ‘निसर्गानुभव’
पर्यटकांना वन्यप्राण्यांविषयी माहिती व्हावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : नागपूर : करोनामुळे दोन वर्ष पर्यटक बुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या ‘निसर्गानुभव’ला (मचाण गणना) मुकले. आता मात्र १६ व १७ मे रोजी राज्यातील जंगलात वनविभागाने निसर्गानुभव आयोजित केला आहे.
बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या मचाण गणनेला आता वनखात्याने निसर्गानुभव असे नाव दिले आहे. वन्यप्राणी गणनेची ‘ट्रान्झ्ॉट लाईन मेथड’ येण्यापूर्वी याच मचाण गणनेतून आलेली आकडेवारी गृहीत धरली जात होती. कालांतराने ही पद्धत बाद होऊन ‘ट्रान्झ्ॉट लाईन मेथड’ने वन्यप्राणी गणना सुरू झाली. त्यामुळे आता मचाण गणनेला ‘निसर्गानुभव’ असे नाव देण्यात आले आहे. २००८ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मचाण गणना अशास्त्रीय असल्याचे सांगून ती बंद केली.
पर्यटकांना वन्यप्राण्यांविषयी माहिती व्हावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला. मात्र, करोनामुळे गेली दोन वर्ष या उपक्रमाचा आनंद पर्यटकांना घेता आला नाही. शेवटचा निसर्गानुभव हा उपक्रम १९ मे २०१९ ला झाला होता. त्यामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या उपक्रमासाठी वनखात्यानेही पूर्ण तयारी केली असून पर्यटक देखील उत्साहात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे गाभा क्षेत्र वगळता सर्व व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यामध्ये निसर्गानुभव अनुभवता येणार आहे.
मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या सहाही विभागात तो होणार आहे. तसेच नवेगाव-नागझिरा, पेंच, बोर आदी व्याघ्रप्रकल्पातही निसर्गानुभवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्वयंसेवी आणि प्रसारमाध्यमांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी लवकरच तारीख जाहीर केली जाणार असून त्या तारखेनंतर आलेले प्रवेश स्वीकारले जाणार नाहीत. तसेच स्वयंसेवी आणि प्रसारमाध्यमांसाठी असलेल्या राखीव जागा भरल्या गेल्या नाहीत तर त्या जागेवर इतरांना प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निसर्गानुभवसाठी प्रवेश दिला जाईल. नोंदणीसाठी वनखात्याच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निसर्गानुभव उपक्रमाची रुपरेषा अंतिम होईल. निसर्गानुभवाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असून जुन्या मचाणांची दुरुस्ती व नवीन मचाणांची बांधणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत