Breaking News

कोट्यवधींचा रस्ता की भ्रष्टाचाराचा महामार्ग?

भेंडवी फाटा–सिद्धेश्वर फाटा रस्त्याची अक्षरशः चाळण;

 कमिशनखोरीने रस्ता गिळंकृत केल्याचा नागरिकांचा आरोप

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, राजुरा : शासनाच्या विकासकामांच्या गाजावाजामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला भेंडवी फाटा ते सिद्धेश्वर फाटा रस्ता आज भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाचा जिवंत पुरावा बनला आहे. रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की, हा रस्ता नेमका नागरिकांच्या सोयीसाठी बांधला की कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या खिशासाठी, असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या कामाचे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून रोज अपघाताचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी खर्च झालेला निधी आणि प्रत्यक्षात झालेली कामाची गुणवत्ता यामध्ये प्रचंड तफावत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

अधिकारी झोपेत, कंत्राटदार मौजेत?

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याऐवजी कंत्राटदाराला मोकळे रान दिले. परिणामी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ता उभारण्यात आला आणि त्याची किंमत आता सामान्य जनतेला मोजावी लागत आहे.

 "कमिशनखोरीमुळे अधिकारी सुस्तीत आणि कंत्राटदार बोगस काम करून मस्तीत आहेत," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात रस्ता की मृत्यूचा सापळा?

पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील खड्डे अधिकच खोल झाले आहेत. अनेक ठिकाणी डांबर वाहून गेले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्याचा मोठा फटका बसत आहे.

ग्रामस्थांच्या मते, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कामाचे तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार काम करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जनतेचा थेट सवाल

"कोट्यवधी रुपये खर्च होतात, मग काही महिन्यांतच रस्ते उखडतात कसे? विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि भ्रष्टाचार नेमका किती दिवस सुरू राहणार?"

भेंडवी फाटा ते सिद्धेश्वर फाटा रस्त्यावरील या गंभीर प्रकाराकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून संबंधित विभागाचे अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत