Breaking News

तो.. पांदन रस्ता कधी पूर्ण होणार ?

तो.. पांदन रस्ता कधी पूर्ण होणार ?

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : संबंधितांद्वारे पांदन रस्त्यांचे गाजे-वाजे करण्यात येत असले तरी, रामटेक तालुक्यात अद्यापही पाणंद रस्त्याची समस्या सुटली नाही. काही ठिकाणी पाणंद रस्ता आहे. पण नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना पाण्यातून शेतात जावे लागत आहे. तर काही शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाणंद नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील हिवरा बेंडे गावापासून चेक पोस्टकडे जाण्यासाठी १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना पाणंद रस्ता बनविण्यात आला. या रस्त्यावर एक नाला लागतो. त्या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसांत पाण्यातून शेतात जावे लागते. शेतकरी येथे अण्णापूर्णा ढाब्याजवळून जात होते. ही जागा खाजगी असल्याने व मालकाचे नुकसान होत असल्याने त्याने काट्या टाकून हा रस्ता बंद केला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता या पुलासाठी निधी मंजूर झाला होता. मटेरिअलसुद्धा ठेवण्यात आले होते. भूमिपूजनही झाले होते. पण ठेकेदाराने हे काम सोडून पोबारा केला. त्यामुळे हे काम रद्द झाले. आता परत हे काम मंजूर झाले आहे. पण अद्यापही काम सुरू झालेले नाही हे सत्य समोर आले.

कांद्री ते देवरी हा पाणंद रस्ता न झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला अडचण निर्माण झाली आहे. या मार्गावर शिवधुरा आहे. या मार्गाने शेतकरी शेतात जातात. पण मार्गावर अतिक्रमण झाले आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांना विचारणा केली असता याठिकाणी पुलाचे काम मंजूर झाल्याचे सांगितले. टेंडर झाले की, दोन महिन्यांत हे काम होईल. कांद्री ते देवरी पाणंद रस्तासुद्धा मंजूर केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत