फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती पोलीस जप्त करणार !
फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती पोलीस जप्त करणार !
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : सुशिक्षित बेरोजगार युवकांना रेल्वे, बँक आणि डब्ल्यूसीएलमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेले इतरही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली चालविल्या आहे.
या आरोपींची संपत्ती जप्त करून पैसे परत मिळावे, अशी अपेक्षा पीडितांनी व्यक्त केली आहे.. उदय हरिभाऊ उमरकर (रा. रिज रोड, कुकडे ले-आउट, नागपूर) असे एका पीडितेचे नाव आहे. त्यांनी अभियांत्रिकीचे (सॉफ्टवेअर) शिक्षण घेतले आहे. आरोपींनी वर्ष २०१८ मध्ये उदय यांना मध्य रेल्वेत अभियंता म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्या बदल्यात २० व ५० लाख रुपये घेतले.
मात्र, नोकरी न लावून देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. यामध्ये अजनी रेल्वे क्वॉर्टरमध्ये राहणारा आरोपी राजेंद्र तिवारी व त्याचे साथीदार इरफान शेख व रशिद आलम यांचा समावेश आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक राजेंद्र निकम यांनी या नोकरी लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने उदयसह अनेक पीडितांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहर पोलिसांनीही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांची संपत्ती जप्त करून पैसे परत करावे, अशी त्यांची मागणी आहे. महाठगांच्या रॅकेटचे जाळे नागपूर ते बिहार आणि बिहार ते कोलकातापर्यंत पसरल्याचे समोर आले आहे. विदर्भातील अनेकांना त्यांनी गंडा घातला आहे.
त्यामुळे ही फसवणूक २ कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते. टोळीमध्ये कोलकाता येथील काही रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांचासुद्धा सहभाग असल्याचे म्हटले जाते. ही टोळी अंदाजे वर्ष २०१७ पासून सक्रिय असल्याचे सांगितले जाते. यातील एक मध्यस्थ व आरोपी अमित कोवे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी व्हॉट्सअॅपवर सुसाइड नोट लिहून ठेवल्याने रॅकेटचा पर्दाफाश झाला.
पीडितांमध्ये महालातील एका माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पुतण्याचाही समावेश आहे. कोतवाली हद्दीतील महालमधील एका युवतीला रेल्वेत टीसीपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी १० लाख रुपये घेतल्याचे म्हटले जाते. आरोपींनी अनेकांना रेल्वेचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले. कोलकातामधील रेल्वे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसुद्धा केली. तर अनेकांना खोटे मुलाखत पत्र दिल्याचे निदर्शनास आले आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत