शहरातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या
आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ
महा घडामोडी न्यूज नेटवर्क नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉ. देवानंद जाजू यांच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. देवानंद जाजू हे शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख होते. तसेच ते भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख होते. डॉ. जाजू यांनी आत्महत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नांदेडचे ग्रामीण पोलीस याप्रकरणी तपास करत असून तपासाअंती सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
डॉ. जाजू हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून नांदेड शहराच्या सिडको भागात वैद्यकीय सेवा देत होते. त्यांचे रुग्णालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. त्यांच्या पत्नीदेखील डॉक्टर आहेत. पण त्या मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. तर डॉ. जाजू हे नांदेडमध्येच रुग्णसेवा करायचे. या दरम्यान आज दुपारी नांदेड ग्रामीण पोलिसांना डॉ. जाजू यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी डॉ. जाजू यांचं निधन झाल्याचं स्पष्ट झालं.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत