Breaking News

धान उत्पादकांना पीक विम्याचा लाभ द्यावा

 धान उत्पादकांना पीक विम्याचा लाभ द्यावा

माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांची मागणी 

महा घडामोडी न्युज विशेष जिल्हा प्रतिनिधी,कालिदास खोब्रागडे,भंडारा : खरीप हंगाम २०२० आणि २०२१ मध्ये वातावरणातील बदल तसेच धान पिकावर रोग आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे धान उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे वित्तीय संस्थातून पीक कर्ज घेणाऱ्या धान उत्पादकांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे. 

लाखनी तालुक्यात १ नगर पंचायत व ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर आहे. खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ८५४ हेक्टर असून २२ हजार ९५६ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड केली जाते. तर खातेदार संख्या ३६ हजार आहे. खरीप हंगामात खर्चाचा ताळमेळ बसावा. याकरिता धान उत्पादक शेतकरी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांतून पीक कर्ज घेतो. पीक कर्ज घेतानाच त्याचा विमा उतरविला जातो. नैसर्गिक संकटामुळे धान पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी. हा उद्देश असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांचे म्हणणे आहे.

 खरीप हंगाम २०२० मध्ये रोवणी आटोपताच २० व २१ आणि ३० व ३१ ऑगस्ट रोजी संततधार पाऊस व अतिवृष्टीने तसेच मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे पाणी सोडल्यामुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने महसूल प्रशासनाने अंतिम आणेवारी ४५ पैसे जाहीर केली. तसेच खरीप हंगाम २०२१ मध्ये सरासरी पेक्षा कमी पर्जन्यवृष्टी व धान पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे धानाचे उत्पादनात घट होऊन आणेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आली. 

खरीप हंगाम २०२० आणि २०२१ मध्ये पीक कर्ज उचलणाऱ्या धान उत्पादकांनी एच.डी.एफ.सी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई कडून विमा उतरविला होता. अर्ध्यापेक्षा अधिक नुकसान होऊनही विमा कंपनीने धान उत्पादकांना पीक विम्याचा लाभ दिला नसल्यामुळे लवकरात लवकर देण्यात यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत