Breaking News

ज्येष्ठ नागरिक संघ वरोरा द्वारा आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न

ज्येष्ठ नागरिक संघ वरोरा द्वारा आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,खेमचंद नेरकर,वरोरा : ज्येष्ठ नागरिक संघ वरोरा द्वारा दिनांक ३० मे २०२२ ला अंबादेवी देवस्थान सभागृहात ज्येष्ठांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. मार्गदर्शन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळू मुंजनकर यांनी केले. पुरातन काळापासून भारतात आयुर्वेदिक चिकित्सा करण्यात येत आहे. ह्यात केवळ शारिरीक निदान व औषधोपचार नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक उपचारांचा प्रयोग सांगितला आहे. आधुनिक चिकित्सा पद्धतीत नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. 

त्यामुळे आरोग्य विषयक तक्रारीचे निराकरण सोपे झाले आहे. ज्येष्ठांनी स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी शासनाच्या सवलतींचा लाभ घ्यावा. नियमित तपासण्या करून घ्याव्यात, नियमित औषधोपचार सोबतच व्यायाम, प्राणायम, ध्यान प्रार्थना, सद्‌विचार, संतुलित आहार, संयमित व सकारात्मक जीवनशैलीचा उपयोग करावा. दीर्घायुष्य व निरामय आरोग्याची ही गुरुकिल्ली होय. ह्या प्रसंगी त्यांचा शाल, आरोग्यनिधी (पुस्तीका) आणि पंच औषधी रोपांचा गुच्छ देऊन संघातर्फे सन्मान करण्यात आला.

ह्या कार्यक्रम प्रसंगी २५ सदस्यांचा सामुहिक वाढदिवस सोहळा सहपरिवार पार पाडण्यात आला. प्रमुख अतिथी आचार्य ना. गो. थुटे यांनी आपले विचार मांडले, संघाचा इतिहास, शासनाच्या योजना व ज्येष्ठांचे कर्तव्य यावर सविस्तर विचार प्रकट केले. श्रीमती सिंधुताई उत्तरवार श्री. दे. झि. कांबळे, विठ्ठलराव माथुलकर, विठ्ठलराव कहुरके ह्या मानकर्यांनी मनोगत व्यक्त करतांना संघाच्या उपक्रमाची प्रशंसा केली. ज्येष्ठांचा हा आनंदमेळा स्फुर्तिदायी उपयोगी असल्याचे सांगितले. 

कुमार डोंगे ह्यांनी उस्फुर्त  प्रतिक्रिया देतांना म्हटले की माझ्या आईवडिलांचा हा वाढदिवस सोहळा पाहतांना मला व कुटुंबियांना झालेला आनंद शब्दापलिकडचा आहे. आम्ही आनंदाने गहिवरलो आहोत. प्रास्ताविकातून सचिव श्री. मा. कि. मगरे ह्यांनी संघाच्या कार्याचा व उपक्रमांचा लेखाजोखा सभेपुढे ठेवला. अध्यक्षीय भाषणात श्री. सोनेकर यांनी संघसदस्यांच्या सहकार्य भावनेचे व सहभागाचे कौतुक केले. 'खरा तो एकचि धर्म गीताचे सुस्वर गायन कु. गुंजन सोरते, कु· रविना कन्नाके,  कु. सागरिका गुमगावकर यांनी केले. आभारप्रदर्शन संघाचे कोषाध्यक्ष श्री. भा. गं. चिवंडे यांनी, संचालन श्री. शा. धवने यांनी केले. संघाच्या यशस्वीतेसाठी संघाच्या कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. सुग्रास स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत