Breaking News

निकाल काहीही येवो, निराश होऊ नका; 'हे' दिग्गजही परीक्षेत नापास पण जीवनात मात्र टॉपर

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.निकालानंतर काही जण निराश होतात.त्यातून टोकाची पावलं उचलली जातात.मात्र हा निकाल आपलं संपूर्ण आयुष्य होत नाही.


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल  आज जाहीर होणार आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. मात्र हा निकाल आपलं संपूर्ण आयुष्य होत नाही. अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन आणि वेगळे प्रयोग करुन जीवनाच्या परीक्षेत टॉपवर असतात. 


दहावी बारावीत नापास झाल्यानंतरही आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या काही उदाहरणांवरुन आपण ही गोष्ट लक्षात घेऊ शकतं. मराठमोळे दिग्दर्शक, लेखक, कवी नागराज मंजुळे यांचं नाव यात मुख्यत: येतं. मंजुळे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केलं होतं. मंजुळेंनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की,  मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी.… परीक्षा कुठलीही असो.  ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही, असं मंजुळे यांनी म्हटलं होतं. 


सैराट, फँड्री, न्यूड, अंधाधूंद, झुंड, गंगुबाई काठियावाड, रेडू यासह अनेक सिनेमात अभिनय केलेली अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया कदम म्हणजे आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारं एक नाव. मात्र ती देखील 12वीच्या परीक्षेत नापास झाली होती. खेळाची आवड त्यातही कबड्डीमध्ये राज्यपातळीवर मैदान गाजवणाऱ्या छाया कदम यांना देखील 12वीत अपयशाला सामोर जावं लागलं होतं. पण या अपयशानं त्या कधीही खचून गेल्या नाहीत. तर त्यावर मात करत आयुष्यात पुन्हा नव्यानं काही तरी करण्यास सज्ज झाल्या.  अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे. 12वीत नापास झाले म्हणून मी कधी टोकाचं पाऊल उचललं नाही. असं म्हणत त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.  


छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी बारावीत नापास झाले होते. पण अपयशाने खचली नाही. मला कबड्डी खेळायला लै आवडायचे. वेडीच होते कबड्डीची. त्यामुळे अभ्यास कमी आणि खेळच जास्त. त्यातच अभ्यासाचा 'खेळ' व्हायचा. स्टेट लेवल पर्यंत कबड्डी खेळले. तिथेही आयुष्याचे काही झाले नाही. मात्र अनुभव खूप आले.आज माझ करियर वेगळ्याच क्षेत्रात धावतय. आयुष्य जगायला मजा येतेय हे मात्र नक्की. सांगायचं तात्पर्य एवढच की, अभ्यास, मार्क हे सर्वस्व नाही मित्रांनो, याचा अर्थ अभ्यास करू नये अस नाही. पण मार्क कमी मिळाले म्हणून हिरमसून जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका एवढेच सांगायचे आहे. वेगवेगळी क्षेत्र आपली वाट बघत आहेत.


नागराज मंजुळे किंवा छाया कदम ही केवळ दोनच अशी नावं नाहीत जी परीक्षेत नापास झाल्यानंतर आज आपलं एक वेगळं विश्व तयार केलंय. अशी कैक नावं आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला या परीक्षेत अपयश आलं तरी खचून जाऊ नका.  

बारावीच्या निकालात मुलींची बाजी, 95.35 टक्के मुली उत्तीर्ण


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच आज बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. अशातच, आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत