एका आय पी एस अधिकारी महिलेवर लिहिलेली छान कविता....
एका आय पी एस अधिकारी महिलेवर लिहिलेली छान कविता....
नवरा बिचारा काय म्हणतो
किमान ऐकून घ्या,
पटलं तर हो म्हणा
नाहीतर सोडून द्या... !!
साध्या क्षुल्लक कारणा वरून
वाद घालू नका,
घरातल्या मोठ्या माणसांना
चर चर बोलू नका... !!
काय उपयोग आहे तुझ्या
उच्च शिक्षित असण्याचा,
मुळीच गर्व करू नकोस
थोडं बरं दिसण्याचा.....!!
नोकरी करतेस , हातभार लावतेस
चांगलीच गोष्ट आहे,
फड फड तुझं बोलणं
कुठं बरं बेस्ट आहे.....?
आईशी सलगी करतांना
सासुशी नको भांडू ,
आयुष्यातले सुखाचे क्षण
उगीच नको ना सांडू.....!!
स्वछता, टापटीप
घर पॉश असावं,
याचा अर्थ असा तर नाही,
की घरात कुणीच नसावं....!!
थकलेले आई वडील
सांग कुठे जातील...?
आज ना उद्या आई बाबा
मुला कडेच तर येतील.....!!
खरं सांग या मुद्द्यावर
भांडण व्हायलाच पाहिजे का...?
म्हातारपणी त्यांनी काय
आश्रमात जायला पाहिजे का....?
अशिक्षित आहेत, साधे आहेत
मान्य आहे मला,
याचा अर्थ असा नाही की
घालून पाडून बोला.....!!
आई वडिलांचं दिसणं नाही
असणं महत्वाचं असतं,
म्हातारी माणसं असतील तर
घर कसं शोभून दिसतं....!!
आई वडील घरात असणं हा
इंटेरियरचाच भाग आहे,
समजू नकोस सुरकूतला चेहरा
पॉश घराला दाग आहे....!!
खर्च होतो-खर्च होतो
होऊ दे, आशीर्वाद मिळेल,
तू म्हातारी झाल्यावर तूला
सारं काही कळेल.....!!
शिकली सवरली मुलगी तू
यावरून काडीमोड व्हावेत....?
लाखोंचं पॅकेज असलं, तरी
मार्क शून्य द्यावेत.....!!
तुझ्या आई वडिलांचा
मी आदर करतो,
पाहतीस ना तू चालतांना
त्यांचाही हात धरतो......!!
थकलेल्या देहां सोबत
आपलं तुपलं करू नको,
माणसांना दूर फेकून
वस्तूंनी घर भरू नको.....!!
म्हाताऱ्यांना काही नको
फक्त गोड बोला,
म्हण न तू सासूबाई जरा
वालाच्या शेंगा सोला.....!!
मुलींनो समजून घ्या
नवरा काय म्हणतो,
माया,प्रेम ,
आपुलकीनेच घराचा स्वर्ग बनतो..... !
- प्रा. एस. एम. झाडे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत