Breaking News

मुसळधार पावसाने झोडपले, रस्त्यांवर साचले पाणी, अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना

 पुणे पुन्हा तुंबले ! 

मुसळधार पावसाने झोडपले, रस्त्यांवर साचले पाणी, अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना

 सोमवारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पुणेकरांची पुन्हा दाणादाण उडाली. शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले होते. यामुळे पालिका प्रशासनाचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,अविनाश मुंढे, पुणे : सोमवारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाने तूफान हजेरी लावली. पुण्यातील अनेक भागात काही तासांत वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. काही तास पडलेल्या पावसामुळे शरातील अनेक रस्त्यांवर पुरस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. तर अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. शिवाजीनगर परिसरात रात्री ११ः३० पर्यंत तब्बल ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज झालेल्या पावसामुळे काही तासांत पुणे पुन्हा तुंबल्याने सर्वसामान्य पुणेकरांचे हाल झाले. दरम्यान, पुणे, पिंपरीचिंचवड आणि लगतच्या क्षेत्रावर सध्या ९ ते ११ किमी उंचीचे ढग सक्रिय आहेत. पावसाचा जोर पुढील तासभर राहण्याची शक्यता आहे. सखल भागांत, रस्त्यांवर पाणी साचणे, फ्लॅश फ्लड, झाडे पडणे, वाहतूक खोळंबणे आदी घटना शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्याला आज पुन्हा वादळी वाऱ्याने झोडपले. वादळी वाऱ्यासह काही तासांत झालेल्या पावसामुळे मध्य पुणे आणि शहराच्या आजू बाजूला मोठ्या प्रमाणात पणीसाठले होते. दगडूशेठ मंदिरासमोर झालेल्या पावसामुळे तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुर आला होता. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. अनेक वाहने या पाण्यात अडकली होती. राती १०. ४० च्या सुमारास सोमवार पेठ येथे मीटर बॉक्स शॉर्टसर्किटची घटना घडली. तर येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड या ठिकाणी अनेक घरात पाणी शिरले. हडपसर, आकाशवाणी जवळ झाडे पडली.

दोन दिवसांपूर्वी देखील पुण्याला पावसाने झोडपले होते. डेक्कन परिसरात पाणी साचल्याने रस्त्यावरील काही गाड्या वाहून गेल्या होत्या. तर रस्त्यावर पुरस्थिती निर्माण झाली होती. पाण्याला जाण्यास कुठेही जागा नसल्याने जागो जागी पाणी साचले होते. आज देखील रात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या पवासमुळे पुणेकरांची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, त्या ठिकाणी अग्निशमन दलातर्फे मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. या पावसामुळे कुठेही जीवित हानी झाल्याची घटना सुदैवाने घडली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत