काँग्रेसचे इच्छुक करणार पाच वर्षे प्रतीक्षा; गडकरी यांच्या नावामुळे उत्साह मावळला
काँग्रेसचे इच्छुक करणार पाच वर्षे प्रतीक्षा; गडकरी यांच्या नावामुळे उत्साह मावळला
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्याने आता काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असलेल्यांचा उत्साह मावळला आहे. अनेकांनी आणखी पाच वर्षे थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे आता काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
नागपूर लोकसभा मतदरासंघातून शहर काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी कुकडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
या संदर्भात काँग्रेसने मुंबईत बैठक घेऊन इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र पक्षाने निर्णय घेतला नाही. नितीन गडकरी यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने या चर्चांनी आणखीच जोर धरला होता.
उद्वव ठाकरे यांनी गडकरी यांना शिवसेनेत येण्याचे थेट आमंत्रण दिले होते. मोदी-शहा यांच्या धक्कातंत्राच्या राजकारणामुळे भाजपचे कार्यकर्तेही चिंतेत होते. त्यामुळे काँग्रेसकडून अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून ठेवले होते. काँग्रेसच्या एका युवा नेत्याने गडकरी उमेदवार नसेल तरच आपण लढू असे थेट सांगून टाकले होते.
विकास ठाकरे यांनी यापूर्वीच लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. बंटी शेळके यांची दावेदारी ज्येष्ठ नेते सहजासहजी मान्य करणार नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे अभिजित वंजारी हेच काँग्रेसचे उमेदवार राहतील असे बोलले जात आहे. मात्र आता गडकरी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते होकार देण्याची शक्यता नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गडकरी यांच्या विरोधात लढले होते. त्यापूर्वीच्या निवडणुकीत माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांना गडकरी यांनी पराभूत केले होते. गडकरींना विजयी करणे हे भाजपसाठी प्रतिष्ठेचे आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत