महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली कुटुंबाला पाठवलं तुरुंगात, चोरट्यांनी घरात शिरुन उडवले १७ लाख
महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली कुटुंबाला पाठवलं तुरुंगात, चोरट्यांनी घरात शिरुन उडवले १७ लाख
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: वस्तीतील महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठविल्यानंतर घरात चोरट्यांनी शिरून धाडसी चोरी करीत, १६ लाख ७६ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी (ता.२१) सांयकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरुणकुमार श्यामानंद त्रिपाठी (वय ५२,रा. वसंत विहार, खडगाव रोड, दत्तवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.
त्यांच्यावर वस्तीतील महिलेशी झालेल्या भांडणातून विनयभंग प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. त्यातून त्यांच्यासह मुलगा, मुलगी आणि पत्नी यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात सादर केल्यावर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान २१ तारखेला त्यांना जामीन मिळाल्याने ते घरी परतले. मात्र, घरासमोर गर्दी होती. घराच्या मुख्य दाराचे कुलुप तुटल्याचे दिसले.
याची माहिती पोलिसांना शेजाऱ्यांनी दिल्याने अगोदरच पोलिस आलेले होते. अरुण यांनी आत जाऊन बघितले असता, त्यांच्या घरात तिजोरीचे कुलुप तोडून त्यातील सात लाख ७८ हजारांची रोख, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ लाख ७४ हजार ७९२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अविनाश निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कोळी यांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत