नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा; काय आहे अजेंडा जाणून घ्या
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा; काय आहे अजेंडा जाणून घ्या
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्च दरम्यान नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात होणार आहे.राम मंदिर निर्माणानंतर त्यासंदर्भातील पुढील योजना, संघाचे शताब्दी वर्ष, शाखांचा विस्तार अशा महत्त्वाच्या विविध प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. सरसंघचालकांनंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह पदाची निवडणूक हे या बैठकीचे वैशिष्ट राहणार आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या संदर्भात माहिती दिली. श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा ही फार मोठी ऐतिहासिक घटना असून याचे सकारात्मक दुरगामी परिणाम होणार आहेत. त्यादिशेने भविष्यातील योजना ठरवण्यावर प्रतिनिधी बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे आंबेकर यांनी यावेळी सांगितले. मागील ९९ वर्षांपासून संघ समाजामध्ये काम करत आहे.
२०२५च्या विजयादशमीला संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने हे महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक अत्यंत महत्त्वाची असून स्मृती मंदिर परिसरात १५ ते १७ मार्च तीन दिवस चालणार आहे. प्रत्येक तीन वर्षातून ही सभा नागपुरात होते. बैठकीला संघाच्या ३२ संघटनांचे प्रमुख, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपचे अध्यक्ष, संघटन मंत्री असे देशभरातून १५२९ कार्यकर्तांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. यात प्रांत आणि क्षेत्रिय स्तरावर संघाच्या विविध संघटनांचे काम करणाऱ्यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
देशभरात संघाचा शाखांच्या माध्यमातून जे काम चालते त्याची समक्षा या बैठकीत केली जाणार आहे. तसेच देशभरातील संघाच्या कामांची समिक्षा केली जाणार आहे. बैठकीच्या सुरुवातीला म्हणजे १५ मार्चला सरकार्यवाह देशभरातील कामांचे अहवाल देतील. संघाचे शताब्दी वर्ष येत असल्याने कार्यविस्तारावर योजना तयार केली जाणार आहे. सध्या संघाच्या ६८ हजार शाखा नियमित सुरू असून शताब्दी वर्ष सुरू होण्याआधी १ लाख शाखा करण्याचे लक्ष असल्याचे आंबेकर म्हणाले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत