वन विभागातील निष्क्रिय भरारी पथक आणि अतिक्रमण निर्मूलन पथक बंद करण्याची मागणी - बादल बेले
वन विभागातील निष्क्रिय भरारी पथक आणि अतिक्रमण निर्मूलन पथक बंद करण्याची मागणी-बादल बेले
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : वन विभागात कार्यरत भरारी पथक आणि अतिक्रमण निर्मूलन पथक असूनही त्यांच्या निष्क्रियतेमुळे वने व वन्यजीव संरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे ही दोन्ही पथके बंद करून प्रशिक्षित व सक्षम वनकर्मचाऱ्यांचे एकच शीघ्र कृती दल निर्माण करावे, अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी केली आहे.
वन विभागातील सद्यस्थिती आणि निष्क्रियता
वनसंरक्षणासाठी वन विभागाकडून भरारी पथक व अतिक्रमण निर्मूलन पथक कार्यरत आहेत. यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि आवश्यक साहित्य पुरवले जाते. मात्र, लाखो रुपये खर्च करूनही या पथकाने गेल्या सात वर्षांत कोणतीही ठोस कामगिरी बजावलेली नाही.
आजही मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड, रेती व मुरूम तस्करी, तसेच वन्यजीवांची शिकार सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच राजुरा येथे आंतरराष्ट्रीय वाघ शिकारी करणारी टोळी पकडण्यात आली. त्याचबरोबर कोष्टाळा, चिखली आणि गणेरी येथील वृक्षतोडीच्या घटनाही ताज्या आहेत. मात्र, वन विभागाच्या या पथकांनी फक्त कागदोपत्री अहवाल सादर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे.
मध्य चांदा वन विभागात वाढता धोका
मध्य चांदा वन विभागात सुमारे आठ वनपरिक्षेत्र असून, येथे मोठ्या प्रमाणावर मौल्यवान सागवान वृक्षसंभार आणि वन्यजीव आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अशा घटनांमध्ये हे पथक कुठेही पुढाकार घेताना दिसत नाही. सामान्य वनपाल आणि वनरक्षक आपल्या नियमित प्रादेशिक कामांमध्ये व्यस्त असतात, त्यामुळे वनसंरक्षणाच्या दृष्टीने नियुक्त पथकांनी कार्यरत राहणे गरजेचे असते.
पथक रद्द करून सक्षम शीघ्र कृती दलाची मागणी
या पथकांमधील निष्क्रियता पाहता भरारी पथक आणि अतिक्रमण निर्मूलन पथक तातडीने बंद करून प्रशिक्षित, सक्षम व सशस्त्र वन कर्मचारी पथक स्थापन करावे. असे झाल्यास वनसंरक्षण अधिक प्रभावीपणे होईल आणि वनतस्करी, शिकारी, वृक्षतोड आणि अतिक्रमणाला आळा घालता येईल, असे बादल बेले यांनी स्पष्ट केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत