Breaking News

"जुगार, दारू, गांजा – गडचांदूरमध्ये खुलेआम गैरकायदेशीर व्यवहार!"


पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गडचांदूर शहर बनले अवैध अर्थव्यवहारांचे केंद्र ?

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, गडचांदूर : एकेकाळी औद्योगिक आणि सामाजिक चैतन्याने भरलेलं गडचांदूर शहर आज "अवैध आर्थिक नगरी" म्हणून ओळखलं जात आहे. जुगार, मटका, अवैध दारू, कोळसा व रेती तस्करी, सुगंधी तंबाखूचा काळाबाजार आणि गांजासारख्या व्यसनमूलक पदार्थांची खुलेआम विक्री – हे सर्व धंदे शहरात जोमात सुरू आहेत. विशेष म्हणजे, याकडे स्थानिक पोलीस ठाण्याचे ठाणेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.

अवैध धंद्यांचा कहर – समाजाचं विघटन

गडचांदूरमध्ये अवैध सट्टा (मटका) हा समाजासाठी घातक ठरत असून, अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या जाळ्यात अडकत चालले आहेत. दरमहा लाखो रुपयांची उलाढाल सुरू असून, कर्जबाजारी होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय.

“आमच्या डोक्यावर ठाणेदाराचा आशीर्वाद” – धंदेवाल्यांची उघड धमकी

शहरात अशी उघड चर्चा आहे की, हे अवैध धंदेवाले थेट ठाणेदाराला हप्ता देतात, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. “कोणी आमचं काहीही बिघडवू शकत नाही” असं गर्वाने बोलणारे धंदेवाले प्रशासनाची प्रतिमा मलीन करत आहेत.

पोलिस खात्यातही नाराजी?

पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ठाणेदार बद्दल कुजबुज सुरू आहे की. सगळा माल एकटाच दाबत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा होत आहे. म्हणून काही पोलीस कर्मचारी गुपचूप छोटे-मोठे अवैध धंदेवाल्यांना हाताशी धरून वसुली करण्यात तबरेज झाले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष आवश्यक

जनतेतून मागणी केली जात आहे की, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गडचांदूर शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून समाजात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करावी. तसेच, या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

“बातम्या लावा” म्हणणारा ठाणेदार – म्हणजेच उत्तरदायित्वाला थेट ठोसा!

"लोकशाहीत लोकांचा आवाज दाबण्याऐवजी ऐकण्याची गरज असते, पण गडचांदूरचे ठाणेदार मात्र सवाल विचारल्यावर ‘बातम्या लावा’ असं उद्धटपणे उत्तर देतात – हे केवळ गर्वाचं नाही, तर जबाबदारीपासून पळण्याचं लक्षण आहे.

पोलीस प्रशासन हे लोकसेवेचं एक महत्त्वाचं अंग असतं. नागरिकांनी अवैध धंद्यांवर प्रश्न उपस्थित केल्यास, त्यांचं उत्तर देणं, तपास करणं आणि गुन्हे आटोक्यात आणणं ही किमान अपेक्षा असते. मात्र येथे प्रश्न विचारल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे, आणि पत्रकारांना 'पाहिजे तेवढ्या बातम्या लावा' असं म्हणणं म्हणजेच वास्तवाला नाकारण्याचा अहंकारी प्रयत्न आहे.

हा उद्दामपणा केवळ व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ज्यांना कायद्याची राखण करायची आहे, त्यांनी जर कायदाचं उल्लंघन झाकण्याचा प्रयत्न केला, तर मग सामान्य माणूस न्यायासाठी कुणाकडे पाहणार ? हा फक्त पत्रकारांचा अपमान नाही – हा लोकशाही प्रतिष्ठेचा अवमान आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत