Breaking News

कोरपना तालुक्यातील सावलहिरा येथे विद्युत अपघातात युवक ठार


कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा बळी – शेतकरी कुटुंबावर शोककळा

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, हकानी शेख | चंद्रपूर ,कोरपना : खरीप हंगाम सुरु असल्याने शेतकरी सहकुटुंबासहित आपल्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशातच कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. आनंद जोगी (वय २०) या युवकाचा जमीनीवर तुटून पडलेल्या जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाला.

ही घटना २५ जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद जोगी शेतात काम करत असताना अचानक जमिनीवर पडलेल्या वीज तारेचा संपर्क येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना कळताच स्थानिक प्रशासन — तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच महावितरणचे अधिकारी — तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढील तपास कोरपना पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात?

या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांत तीव्र रोष निर्माण झाला आहे. नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार, महावितरणच्या कंत्राटदारांनी फक्त १५ दिवसांपूर्वीच शेतातून विद्युत खांब टाकले होते. हे खांब केवळ २ फूट खोल खड्ड्यात बसवले गेले होते व त्यात आवश्यक सिमेंट काँक्रेट देखील भरले गेले नव्हते. या निष्काळजी व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वीज खांब कोसळून ही दुर्दैवी घटना घडली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

नागरिकांची मागणी – नुकसानभरपाई व कंत्राटदारावर कारवाई

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरणकडे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची व मृतकाच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. महावितरणने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.

आता लक्ष महावितरण व प्रशासकीय यंत्रणेच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत