बल्लारपूरच्या वाहतूक कोंडीला लगाम लावा ! आम आदमी पार्टीची पोलिसांना ठणकावणारी मागणी
महा घडामोडी न्यूज | जिल्हा प्रतिनिधी, हकानी शेख | बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत "आम आदमी पार्टी, बल्लारपूर" यांनी ठोस पावले उचलण्याची मागणी करत शहर पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले. हे निवेदन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक तसेच बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देखील पाठवण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीचे ठळक कारणे
बल्लारपूर शहरास सध्या बायपासचा अभाव असल्यामुळे सर्व जड वाहतूक थेट शहराच्या मध्यवर्ती महामार्गावरून पार पडते. या रस्त्यावरच शाळा, कार्यालये, रुग्णालय, बस स्टँड, पोलीस स्टेशन अशा महत्त्वाच्या ठिकाणांची गर्दी असल्यामुळे रहदारी अत्यंत गंभीर बनली आहे.
प्रमुख अडचणी:
- शहरात अतिक्रमणांचे वाढते प्रमाण
- पेपर मिलमधील ट्रकांची रस्त्यावर बेशिस्त पार्किंग
- महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर – अपघाताचे मोठे प्रमाण
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
- जड वाहनांवर निर्बंध:
- सकाळी ७ ते १०, दुपारी २ ते ४ व सायंकाळी ६ ते ८ या गर्दीच्या वेळेत शहरातून जड वाहने पूर्णतः बंद करावीत.
शिस्तभंग वाहनचालकांवर 'पकड मोहीम':
शाळा-महाविद्यालयांपाशी वेगाने गाडी चालवणाऱ्या, हेल्मेटशिवाय व परवान्याशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवावी.
टोल नाक्यांवर माहिती फलक:
बामणी व विसापूर टोल नाक्यांवर सूचना फलक लावून वाहतूक पोलिसांची तैनाती करण्यात यावी.
अवैध पार्किंगवर कारवाई:
शहरातील अवैध पार्किंग थांबवून संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
मोकाट जनावरांवर नियंत्रण:
नगरपालिकेला ५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, जनावरे हटविण्यात अपयश आल्यास दंड आकारण्यात यावा.
वस्ती भागातून जड वाहतूक बंद:
- रहिवासी विभागातून होणारी जड वाहने थांबवावीत.
- हॉल व कॉम्प्लेक्स मालकांवर जबाबदारी:
- पार्किंग व्यवस्था न करणाऱ्या व्यापाऱ्यांना व हॉलधारकांना नोटीस देऊन कडक दंड आकारावा.
शिष्टमंडळात कोण होते उपस्थित?
या निवेदनप्रसंगी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली प्रवक्ते आसिफ शेख, शिक्षण आघाडी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, प्रिया झमारे, शर्मन बंसेल, स्नेहा गौर, हर्षद खंडागडे, आदित्य भागवत, सम्यक गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराध्यक्ष पुप्पलवार यांनी प्रशासनाला इशारा दिला की, तातडीने योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, तर जनतेच्या बाजूने लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. बल्लारपूर शहराच्या सुस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी ही एक निर्णायक पावले ठरणार आहेत, असे मत त्यांनी मांडले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत