Breaking News

विजेच्या धक्याने प्रगतशील शेतकरी रमेश जाधव यांचा जागीच मृत्यू

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी | हकानी शेख,चंद्रपूर : जिवती तालुक्यातील नाईकनगर येथील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावातील प्रगतशील व कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित असलेले रमेश रामु जाधव (वय अंदाजे ४५ वर्षे) यांचा शनिवारी दुपारी शेतामध्येच विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेने नाईकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकाम करत असताना दुर्दैवी मृत्यू

शनिवारी सकाळी रमेश जाधव आपल्या पत्नी सौ. कमल रमेश जाधव आणि शेतमजुरांसोबत शेतात गेले होते. त्यांनी आपल्या शेतातील कपाशी पिकावर फवारणीचे काम सुरू केले होते. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवंडले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली.

याचवेळी सौ. कमल जाधव फवारणीसाठी पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. पावसाच्या धोधो सरींमुळे त्या शेताच्या बांधावर थांबल्या, तर शेतमजूर बैल बंडीच्या जवळ थांबले. रमेश जाधव मात्र शेतातच एका मोठ्या मोवाच्या झाडाखाली थांबले होते.

विजेचा जबरदस्त कडकडाट आणि मृत्यू

पावसासोबत जोरदार विजांचा कडकडाट सुरु झाला. दुर्दैवाने याच दरम्यान मोवाच्या झाडावर वीज कोसळली आणि रमेश जाधव यांना विजेचा धक्का बसला. वीजेचा जोर इतका जबरदस्त होता की ते जागीच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

या दुःखद घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. कमल जाधव, तिन मुली असा आप्त परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह नुकताच यावर्षी पार पडला होता. उरलेल्या दोन मुली अजून अल्पवयीन आहेत.

गावात हळहळ: शासनाकडून मदतीची अपेक्षा

शेतकरी रमेश जाधव यांच्या निधनामुळे संपूर्ण नाईकनगर गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. शेतकरी जीवनातील ही एक वेदनादायक व दुर्दैवी घटना ठरली असून या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत