शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात!
जिवती पोलिस ठाण्याचा अभिनव उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने ठाम पाऊल
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी चंद्रपूर : समाजात व्यसनमुक्तीचा ठोस संदेश पोहोचवण्यासाठी जिवती पोलिस ठाण्याने एक नावीन्यपूर्ण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणारा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे कार्य सुरू असून, त्यामागे ठाणेदार प्रविण जाधव यांची प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टीकोन आहे.
"विद्यार्थ्यांचे शब्द पालक आणि समाज अधिक गांभीर्याने घेतात. त्यामुळे मुलांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे घराघरात पोहोचतो," असे प्रतिपादन ठाणेदार प्रविण जाधव यांनी शासकीय आश्रमशाळा, जिवती येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध व्यसनांच्या – जसे की दारू, तंबाखू, गुटखा इत्यादी – दुष्परिणामांची सखोल माहिती दिली जात असून, व्यसनमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले जाते.
या कार्यक्रमांमध्ये प्रेरणादायी व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि संवादात्मक कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना सजग करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, विद्यार्थ्यांना घरी जाऊन स्वतःच्या पालकांना व शेजाऱ्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारीही सोपवली जाते.
हा उपक्रम सध्या जिवती तालुक्यात प्रभावीपणे राबवला जात असून, भविष्यात तो जिल्हाभरात विस्तारण्याचा मानस पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या नजरेतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत