गडचांदूर पोलिसांची गांजाविरोधात कारवाई; १ किलो ९३ ग्रॅम गांजासह एकाला अटक!
जप्त केलेल्या गांजाची किंमत ५४ हजार ६५० रुपये; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, हकानी शेख चंद्रपूर : गुप्त माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत १ किलो ९३ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची अंदाजित किंमत ५४ हजार ६५० रुपये असून, या प्रकरणी एका ५१ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी सतर्कता दाखविल्याचे दिसून येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात जंगू मारुती कुंभरे (वय ५१ वर्षे, रा. बैलमपूर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) याच्याकडून १ किलो ९३ ग्रॅम गांजा, अंदाजे ५४ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल, ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०८/२०२६, कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब), अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच राजुरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचांदूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद बनबले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, नापोअ बलवंत शर्मा, पोलीस कर्मचारी सूरज ढोले, प्रकाश बाजगीर, साईनाथ उपरे, मनोहर जाधव, पराग राजूरकर आणि महिला पोलीस कर्मचारी कविता पळनाटे यांनी सहभाग घेतला.
अमली पदार्थांच्या अवैध साठवणूक व विक्रीविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होते. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत