Breaking News

शासकीय कर्मचाऱ्यांची राजकीय आणि ठेकेदारी दादागिरी

शासकीय कर्मचाऱ्यांची राजकीय आणि ठेकेदारी दादागिरी – जिवती तालुक्यात बेरोजगार तरुणांचे भवितव्य धोक्यात


महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी | शेख हक्कानी | चंद्रपूर : जिवती तालुका – दुर्गम, डोंगराळ, विकासापासून वंचित आणि बेरोजगारीच्या गर्तेत अडकलेला हा तालुका सध्या एका नव्या समस्येने वेढलेला आहे. तालुक्यातील शासकीय कर्मचारी हे नोकरी सांभाळत गावगाड्यात राजकारण, ठेकेदारी आणि निधीचे खेळ खेळत असल्यामुळे, स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या राजकीय आणि रोजगाराच्या संधीवर गदा आली आहे.

गावागावातील कार्यकर्त्यांवर अन्याय – राजकीय संधी पैशाच्या जोरावर बळकवली

तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये काही तरुण सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. कुणी रुग्णांना दवाखान्यात नेतं, कुणी लग्न कार्यात काम करतो, कुणी अंत्यविधीपर्यंत साथ देतो. हे तरुण गावाचा आधारस्तंभ असूनही, जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा त्यांच्या संधी काढून घेतल्या जातात. गावातीलच काही शासकीय कर्मचारी – जे सध्या नोकरीत कार्यरत आहेत – ते आपल्या नातेवाईकांना उमेदवार म्हणून उभे करतात. पैसे, सत्ताधार, आणि सरकारी संपर्क याच्या जोरावर ते निवडणुका जिंकतात.


ठेकेदारीचा साखळी ताफा – कर्मचारी बनले "कॉन्ट्रॅक्ट किंग"

या कर्मचाऱ्यांचे गावात जाळे पसरले आहे. कुणी रेती-गिट्टी पुरवतो, कुणी JCB व ट्रॅक्टरचा धंदा करतो, कुणी बांधकाम साहित्य, कुणी मजुरांची देखभाल. गावातील तरुणांना कामासाठी वापरले जाते, ओल्या पार्टी देऊन वश केले जाते आणि कामावर प्रश्न विचारला तर दमदाटी केली जाते. परिणामी, नोकरीच्या शोधात असलेला तरुण अधिकच हताश होतो.


राजकीय सत्ता हस्तांतरणामध्ये कर्मचाऱ्यांची लुडबूड

पंचायत समित्या, ग्रामपंचायती, आणि स्वराज्य संस्थांमध्येही हेच कर्मचारी सत्तापालट घडवून आणतात. आपल्या हातातील संपर्क आणि अधिकारांचा वापर करून ते निधीचे वळवणे आपल्या सोयीच्या गावात करतात, आणि त्यातून कामे उचलतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना ना काम मिळते, ना राजकीय संधी.


"आवाज उठवणार नाही, तर महापुरुषांचा आदर करायचा अधिकार नाही" – डॉ. अंकुश गोतावळे

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आपल्या डोळ्यादेखत अन्याय घडत असताना जर आपण गप्प राहिलो, तर कोणत्याही महापुरुषांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. तरुणांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी लढा देऊ.”


"बेरोजगारांच्या हक्कांसाठी युवकांनीच पुढाकार घ्यावा" – सुदाम राठोड, शेतकरी संघटना

तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुदाम राठोड यांनी म्हटले, “या देशात पैसे आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी राजकारणात बेरोजगारांना स्थानच दिलं नाही. आता युवकांनी स्वतः पुढे येऊन अन्यायाविरुद्ध उभं राहावं.”


"शासकीय कर्मचारी आमचं राजकारण हडप करतायत" – विजय गोतावळे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) चे तालुकाध्यक्ष विजय गोतावळे यांनी सांगितले की, “मी स्वतः आणि इतर काही तरुणांनी मिळून उपोषण केलं, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला. पण आमच्यासारखे कार्यकर्ते संधीच्या बाहेर आणि कर्मचारी मात्र आपल्या घरच्या उमेदवारांना पुढे करून निवडणुका जिंकतात.”


"नोकरीत असूनही राजकारणात हस्तक्षेप – घुसखोरी थांबवली पाहिजे" – अमर राठोड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमर राठोड यांनी सांगितले की, “हे कर्मचारी नोकरीत असूनही राजकारणात उतरतात. आपल्या घरच्या लोकांना निवडणुकीत उतरवतात, सत्तेचा वापर करून ठेके घेतात. ह्या कर्मचाऱ्यांची घुसखोरी संपवण्याचा मी निश्चय केला आहे.”


सारांश:

जिवती तालुक्यात एक नवीन सामाजिक शोषण सुरू आहे – शासकीय पदाचा गैरवापर करून बेरोजगार तरुणांचे राजकारण आणि रोजगार हडप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यंत्रणा.
पद, पैसा आणि सत्ता यांच्या जोरावर हे कर्मचारी गावांची लोकशाही व्यवस्थाच गिळत आहेत. आता या अन्यायाविरुद्ध युवकांनी एकत्र येऊन लढा दिला नाही, तर संधींच्या दरवाजावर कायमची कुलूप लावली जाण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत