जिवती तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे दडपण : पत्रकारांवर सोशल मीडियातून हल्ला
जिवतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी |शेख हक्कानी|चंद्रपूर, जिवती : अतिदुर्गम आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या जिवती तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हक्कांवर शासकीय सेवेत असलेले काही कर्मचारी राजकीय नेत्यांशी जवळीकता साधत आपल्या नातेवाईकांना समोर करून ठेखेदारी करत स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हक्कांवर डल्ला मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी स्थानिक बेरोजगार तरुणांनी व्यक्त केलेली खदखद आणि जिवती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांनी मांडलेल्या ठोस आरोपांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांवर तीव्र टीका होत आहे. मात्र, या प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांवर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, ज्यामुळे तालुक्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.
स्थानिक पत्रकारांनी जिवती तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारांचा भांडाफोड करणारी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर, काही कर्मचारी आणि त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पत्रकारांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अपमानास्पद पोस्ट्स, धमकीवजा भाषा आणि पत्रकारांच्या विश्वासार्हतेवर खोटे आरोप लावण्याचे प्रकार समोर येत आहेत.
काही कर्मचाऱ्यांनी आपला प्रभाव वापरून स्थानिक पातळीवर पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये तीव्र वादविवाद सुरू आहे. एक गट पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ उभा आहे, तर दुसरा गट शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या समर्थकांचे समर्थन करत आहे. काही पोस्ट्समध्ये पत्रकारांना "खोट्या बातम्या पसरवणारे" ठरवण्याचा प्रयत्न झाला आहे, तर काहींनी थेट वाघ जिवती या व्हाट्सअप गृपवरर धमक्या दिल्या जात आहेत.
जिवती तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी शासकीय कर्मचारी आणि राजकारण्यांच्या या कथित गैरप्रकारांमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक तरुणांचे म्हणणे आहे की, त्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी पत्रकारांचे समर्थन आवश्यक आहे. मात्र, पत्रकारांवर होणारे हे हल्ले लोकशाहीच्या मूळ तत्त्वांवरच घाला घालणारे आहेत.
"शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या सोयीच्या राजकारण्यांनी जिवतीतील बेरोजगार तरुणांचे आर्थिक आणि राजकीय हक्क हिसकावले आहेत. सत्य उजेडात आणणाऱ्या पत्रकारांवर आता दडपण आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे दबावतंत्र आणि गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही. बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी आमचा लढा अखंड सुरू राहील."- डॉ. अंकुश गोतावळे, अध्यक्ष, जिवती तालुका काँग्रेस कमिटी
जिवती तालुक्यातील काही कर्मचारी हे स्वतः च्या गावात राजकारण करत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमविण्यासाठी ठेकदारी मध्ये उतरत आहे..त्यामुळे अनेक होतकरू युवकांचे नुकसान होत आहे. अशा आशयाची वास्तविकता असलेली बातमी वृत्तपत्रात छापल्यामुळे काही कर्मचारी पत्रकारांना वाघ जिवती या व्हाटस्प गृपवर उघड धमक्या देत आहेत. त्या धमक्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. - अमर राठोड, नगरसेवक, न. पं. जिवती
शासकीय कर्मचाऱ्यांची दडपशाही - पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्न
लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकारितेचा व्यवसाय सध्या गंभीर संकटात आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील पत्रकार जे निर्भीडपणे प्रशासनाच्या, शासकीय यंत्रणांच्या कामकाजावर प्रकाश टाकतात, त्यांना लक्ष्य करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. जिवती तालुक्यातील घटनाक्रम हे त्याचे ज्वलंत उदाहरण ठरते.
शासकीय कर्मचारी, जे लोकसेवक म्हणून काम करायला हवेत, तेच आज ठेकेदार, राजकीय एजंट आणि सत्तेचे माध्यम बनले आहेत. या कर्मचाऱ्यांनी अधिकारांच्या बळावर, गावकऱ्यांचे आणि पत्रकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करणे, ही केवळ प्रशासनातील बिघाडाची नाही तर लोकशाही व्यवस्थेतील गंभीर तुटीची साक्ष आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे आणि सत्य जनतेपुढे मांडणे हे त्यांचे नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य आहे. यावरच जर टीका, धमकी किंवा सोशल मीडियावर बदनामीचा मारा होत असेल, तर हा आपल्यासारख्या संवेदनशील समाजासाठी धोक्याचा इशारा आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई करणे, पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी देणे आणि पारदर्शकतेच्या प्रक्रियांना बळ देणे ही वेळेची गरज आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण नसेल, तर खऱ्या अर्थाने विकास, जनहित आणि अधिकारांविषयी जनजागृती या संकल्पनाच धोक्यात येतील. – महा घडामोडी न्यूज, संपादक



कोणत्याही टिप्पण्या नाहीत