फ्रीशिप योजनेपासून विद्यार्थ्याला वंचित ठेवले जाणे अन्यायकारक
समाजकल्याण पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची गरज
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : गुणवंत असूनही फक्त समाजकल्याण पोर्टलवरील तांत्रिक त्रुटीमुळे एका विद्यार्थ्याला शासनाच्या फ्रीशिप योजनेपासून वंचित ठेवले गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बामणवाडा (पोस्ट चुनाळा, ता. राजुरा) येथील सार्थक सर्वानंद वाघमारे या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यावर या त्रुटीमुळे गडद सावट आले आहे.
सार्थक वाघमारे हा विद्यार्थी सन २०२३-२४ मध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर येथे B.A.M.S. (रेग्युलर) शिक्षण घेत होता. यावर्षी त्याने NEET-2024 ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे MBBS प्रथम वर्षात प्रवेश घेतला. यासाठी त्याने पूर्वी घेतलेल्या BAMS अभ्यासक्रमासाठी प्राप्त झालेली सुमारे तीन लाख रुपयांची फ्रीशिप रक्कम शासनाच्या चलनाद्वारे परत केली. ही कृती शासननिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण आहे.
मात्र MBBS अभ्यासक्रमासाठी फ्रीशिपचा अर्ज करताना समाजकल्याण विभागाच्या पोर्टलवर फॉर्म सबमिट होत नाही. कारण सद्यस्थितीत पोर्टलवर BAMS मधून MBBS मध्ये स्थलांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही प्रणाली उपलब्ध नाही. त्यामुळे शासन धोरणांतर्गत मिळणारी फ्रीशिप मिळू शकत नसून, संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना लाखो रुपयांची फी स्वतः भरावी लागत आहे. ही बाब सामान्य कुटुंबासाठी अत्यंत कठीण आहे.
या प्रकारामुळे ‘शिक्षण सर्वांसाठी’ हे शासनाचे धोरण केवळ घोषणाबाजी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा तांत्रिक अडथळ्यांमुळे केवळ सार्थक नव्हे तर अनेक गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, समाजकल्याण विभागाने तातडीने या पोर्टलमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून अभ्यासक्रम बदलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील न्याय मिळू शकेल. तसेच विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा मांडून शासनाने विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणी बामणवाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सर्वानंद वाघमारे यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत