Breaking News

गडचांदूर-लखमापूर सिमेंट रोड झाला चिखलमय!

पावसात घसरून दररोज अपघात – कंपनी व बांधकाम विभागाचे उघड दुर्लक्ष

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : गडचांदूर-लखमापूर हा तालुक्याला व जिल्ह्याला जोडणारा मुख्य रस्ता असून, आज या रस्त्याची अवस्था अक्षरशः अपघातांचा सापळा बनली आहे. लखमापूर येथील अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईमस्टोन खाणीतून भर पावसात सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक यासाठी थेट जबाबदार असल्याचे स्पष्ट दिसून येते.

सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखलाचे थर साचले असून, पावसात वाहने घसरून दररोज तीन ते चार अपघात घडत आहेत. दुचाकीस्वार व पादचारी यांना सर्वाधिक फटका बसत असून, शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

नागरिकांची प्रचंड गैरसोय

  • रस्त्यावर प्रचंड चिखल झाल्याने पावसाळ्यात वाहतुकीचा वेग थेट अर्धा झाला आहे.
  • दुचाकी, चारचाकी, ट्रक-ट्रॅक्टरसह सर्व वाहनांना रस्ता पार करणे धोकादायक ठरत आहे.
  • दररोज होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून जाण्यासारखे झाले आहे.

कंपनी व बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष

गेल्या वर्षभरापासून या खाणीमुळे स्थानिकांना धुळीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. आता त्यातच ओव्हरलोड वाहतुकीमुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाची चादर पसरली आहे. तरीदेखील अंबुजा कंपनीकडून योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत. बांधकाम विभागाकडूनही संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

तातडीने कारवाईची मागणी

  • या परिस्थितीवर तोडगा न काढल्यास नागरिकांचा रोष भडकण्याची शक्यता आहे.
  • रस्त्यावर साचलेला चिखल तातडीने साफ करावा.
  • पावसाळ्यात खाणीतील ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे थांबवावी.
  • रस्ता सुरक्षित करण्यासाठी बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करावे.

लखमापूर लाईमस्टोन खाणीतून भर पावसात ओव्हरलोड वाहतूक करत असल्याने लखमापूर माइन्स ते गडचांदुर रोड चिखलमय झाल्याने  रोजच अपघात होत आहे कंपनीने पावसात काम थांबवावे अन्यथा माईन्स बंद पाडू. - मोरेश्वर आस्वले, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत लखमापूर.

याबाबत अंबुजा कंपनीला सांगितले असता लखमापूर माइन्स हद्दीत पक्के मटेरिअल टाकून वाहतूक करावी जेणेकरून गडचांदुर लखमापूर माइन्स पर्यंत रस्ता चिकलमय होणार नाही व नागरिकांची गैरसोय टळेल. शुभम अड्डेटवार,  सहाय्यक अभियंता, सा.बा विभाग, गडचांदुर.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत