Breaking News

देवलागुडा गावातील दोन युवकांचा महाराष्ट्र कबड्डी संघात सरळ प्रवेश!

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्क्नी, चंद्रपूर : जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील देवलागुडा गावाने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. गावातील दोन जिगरबाज खेळाडूंनी थेट महाराष्ट्र कबड्डी संघात स्थान पटकावत गावाचे नाव राज्यभर दुमदुमवले आहे.

गणेश जाधव यांचा मुलगा महादेव जाधव आणि मधुकर राठोड (शिल्पकार) यांचा मुलगा युवराज राठोड या दोन्ही तरुणांची मध्यप्रदेश येथे 28 व 29 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

गावातील या दोन तरुणांनी आपल्या घामाने आणि कौशल्याने हे यश मिळवले असून, त्यांच्या निवडीने जिवती तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात दोन्ही खेळाडूंचे स्वागत करत “देवलागुड्याचा शेर महाराष्ट्राचा शान!” अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, स्थानिक नेते, सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी महादेव आणि युवराज यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचा झेंडा उंचावतील, असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत