Breaking News

देशपांडे वाडीतील प्लॉट वर्गीकरण प्रश्न : अहीर यांच्या हस्तक्षेपाने दिलासा मिळण्याची शक्यता

माजी आमदारांच्या पुढाकारातून नागरिकांची धडपड, महसूल मंत्र्यांपर्यंत पोहोचला विषय

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, सुवर्णा बेले, राजूरा : नगरपरिषद क्षेत्रातील किसान वार्ड क्र. १, देशपांडे वाडी येथील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून प्लॉट वर्गीकरणातील विसंगतीमुळे मोठा आर्थिक व कायदेशीर भुर्दंड सहन करावा लागत आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अकृषक परवानगीचा आदेश दिल्यानंतरही तत्कालीन तहसीलदारांनी वर्ग १ चे प्लॉट वर्ग २ मध्ये रूपांतरित केले. या प्रशासनिक निर्णयामुळे सुमारे २५० कुटुंबांना बांधकाम परवानगी, बँकांकडून कर्जसुविधा तसेच जमीन व्यवहारातील हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.

या गंभीर प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या पुढाकारात विकास समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय ओबीसी आयोगाध्यक्ष हंसराज भय्या अहीर यांची WCL सभागृहात भेट घेतली. शिष्टमंडळाने या वेळी सविस्तर निवेदन सादर करून नागरिकांची व्यथा मांडली. त्याआधीच २० सप्टेंबर रोजी अहीर यांनी चंद्रपूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात तातडीने कार्यवाहीचे निर्देश मिळवले होते.

बैठकीदरम्यान उपस्थित एस.डी.ओ. रवींद्र माने व तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांना त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. या चर्चेस माजी आमदार संजय धोटे, WCL चे मुख्य महाव्यवस्थापक इलियास हुसेन, अरुण मस्की, राजू घरोटे, चुनाळा सरपंच बाळनाथ वडस्कर, आयोगाचे खाजगी सचिव प्रशांत घरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विकास समितीचे अध्यक्ष बळीराम खुजे, उपाध्यक्ष केवाराम डांगे, सचिव मधुकर सत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून आपली समस्या प्रत्यक्ष मांडली. अहीर यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष वेधले गेले असून, लवकरच देशपांडे वाडीतील नागरिकांना न्याय मिळेल व त्यांचा दीर्घकाळाचा तगादा संपुष्टात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत