Breaking News

सुपा गावाच्या सुरक्षिततेसाठी मनसे आक्रमक

परप्रांतीयांची मतदार यादीतील नोंद; तहसीलदारांकडे तक्रार, कारवाईची मागणी

महा घडामोडी न्यूज विशेष प्रतिनिधी, पारनेर : सुपा औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांची मतदार यादीत बेकायदेशीर नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर चौकशी झाली. सरपंच व ग्रामसेवक यांनी परप्रांतीयांना कधीही रहिवासी दाखला न दिल्याचे स्पष्ट केले असून, ग्रामसभेतही त्यांची नोंद न करण्याचा ठराव झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, या ठरावाला बगल देत काही अधिकाऱ्यांनी डुप्लिकेट कागदपत्रांच्या आधारे परप्रांतीयांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली असल्याचे समोर आले आहे.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष (माथाडी कामगार सेना) अविनाश पवार यांनी या प्रकरणी तहसीलदार पारनेर यांना निवेदन सादर केले असून, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, डुप्लिकेट आधार कार्डे तयार करून देणारे संगणक चालक, आधार केंद्र चालक, संबंधित बी.एल.ओ. अधिकारी व त्यांच्या संगनमताने ही नोंदणी करणारे जबाबदार व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.

या गंभीर प्रकरणाची झलक देताना पवार म्हणाले,

“सुपा गावच्या सुरक्षिततेला धोक्यात घालणाऱ्या या गैरव्यवहाराचा त्वरित तपास होऊन आठ दिवसांच्या आत कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मनसे-स्टाईल आंदोलन करण्यात येईल.”

निवडणूक शाखेकडून या प्रकरणी लिखित स्वरूपात खुलासा मागवण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी निगडित असलेल्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सुपा ग्रामपंचायतीने परप्रांतीयांची नावे मतदार यादीत नोंदवण्यास नकार दिल्याचे जाहीर केले असले तरी, बी.एल.ओ. अधिकाऱ्यांनी नेमक्या कोणत्या आधारावर ही नोंद केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यावर तहसील प्रशासनाने पारदर्शक चौकशी करणे आवश्यक असल्याचे मनसेने ठासून सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत