सिंधी परिसरात अतिवृष्टीचे सावट; शेतकऱ्यांची सरसकट नुकसान भरपाईची मागणी
सिंधी परिसरात अतिवृष्टीचे सावट ; शेतकऱ्यांची सरसकट नुकसान भरपाईची मागणी
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी सुवर्णा बेले राजुरा : राजुरा तालुक्यातील सिंधी परिसरात मागील महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अतिवृष्टीचे सावट निर्माण झाले आहे. शेतात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जमिनीची धूपसुद्धा होत आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधी गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार राजुरा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात शेतात अवाढव्य पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतही या संदर्भात ठराव घेऊन प्रशासनाने आराजी नुसार पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पूरग्रस्त शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकरीसुद्धा अतिवृष्टीमुळे गंभीरपणे बाधित झाले आहेत. त्यामुळे फक्त पूरग्रस्त नव्हे, तर सर्व पीडित शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच उपस्थित शेतकरी वर्गाने प्रशासनाला या निवेदनाद्वारे नुकसानिचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे अशी मागणी केली. अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यास भाग पडेल.
सदर निवेदन सादर करताना सिंधी येथील उपसरपंच रामभाऊ आबाजी ढुमणे यांच्यासोबत मंगेश रायपल्ले, मधुकर धानोरकर, राजकुमार दामेलवार,रवींद्र चंद्रागडे,दाऊजी ठेंगरे, गंगाराम ठेंगरे, हरिचंद्र ढुमणे, अरुण मोरे,भालचंद्र वैरागडे, प्रशांत चोथले, राहुल धानोरकर,मोरेश्वर उपरे, भारत उपरे, रामदास रायपल्ले, ईश्वर चहारे आदी शेतकरी उपस्थित होते.
बातमी संकलन : प्रविण चिडे, (विरुर स्टे.)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत