परंपरेला उजाळा : विरुर येथील विजयस्तंभाची पूजाअर्चा
परंपरेला उजाळा : विरुर येथील विजयस्तंभाची पूजाअर्चा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, विरूर : गडद इतिहास आणि समृद्ध परंपरेची साक्ष देणाऱ्या विरुर येथील बालाजी देवस्थान परिसरात असलेले विजय स्तंभ आजही गावकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेनुसार दरवर्षी विजयादशमी व पोळ्याच्या दिवशी गावकऱ्यांकडून विजय स्तंभाची विधीवत पूजा-अर्चा केली जाते.
यावर्षीदेखील गावातील ज्येष्ठ नागरिक,तरुणाई व बालकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने पूजाविधी पार पडले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पुजाअर्चा केली. या प्रसंगी धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
गावातील नागरिक सांगतात की,हा विजय स्तंभ वीरतेचे, पराक्रमाचे तसेच ग्रामसंस्कृतीचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या धार्मिक परंपरेमुळे गावातील ऐक्य व एकोप्याला बळ मिळते.विशेष म्हणजे पोळा सण हा शेतकऱ्यांचा सण असल्याने बैलपूजनाबरोबरच या विजय स्तंभाची पूजा करण्याची परंपरा आजही अखंड सुरू आहे.
बालाजी देवस्थानाच्या अंगणात उभा असलेला हा विजय स्तंभ ऐतिहासिक दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या स्तंभाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांनाही या परंपरेचे महत्त्व समजू शकेल. गावकऱ्यांचा सहभाग,परंपरेची जपणूक आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव यामुळे विरुरातील विजय स्तंभ आजही ग्रामस्थांच्या श्रद्धास्थानाचा भाग ठरत आहे.
बातमी संकलन : प्रवीण चिडे, विरूर स्टे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत