नेवासा तालुका राज्यातील पहिला व सातत्यपूर्ण ‘जनन्याय दिन’ साजरा करणारा तालुका— शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, नेवासा : शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उभा राहिलेला नेवासा तालुका आज राज्यात आदर्श ठरत आहे. नेवासा तालुका हा राज्यातील पहिला आणि सातत्यपूर्णपणे जनन्याय दिन साजरा करणारा तालुका असल्याचा अभिमान व्यक्त करत चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी तहसील प्रशासनाचे अभिनंदन केले.
नेवासा तहसील कार्यालयात तहसीलदार संजय बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे आयोजित करण्यात येणाऱ्या जनन्याय दिनामध्ये आज विविध शेतरस्त्यांवरील तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेत चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे, बाळासाहेब थोरात, माका प्रशांत चौधरी, कानिफ कदम, गोपीनाथ मुंडे, साहेबराव आखाडे, मुरलीधर जरी, मतीन पठाण, बाबासाहेब पवार तसेच ५० ते ६० शेतकरी बांधव उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पाच-दोन, १४३ कलम आणि शिव पाणंद शेतरस्ता विषयांवरील प्रकरणांवर विचारविनिमय झाला. नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे आणि अव्वल कारकून गिरीश कुलकर्णी यांनी प्रभावी समन्वय साधत उपस्थितांना आवश्यक मार्गदर्शन केले.
आजपर्यंत अनेक शेतरस्त्यांच्या प्रकरणांची यशस्वी सोडवणूक या जनन्याय दिनाच्या माध्यमातून करण्यात आली असून, या उपक्रमामुळे नेवासा तालुका शेतकरीहिताच्या कामात राज्यातील आदर्श केंद्र ठरला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत