पहाडावरील रस्त्यांची बिकट अवस्था
पहाडावरील रस्त्यांची बिकट अवस्था
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : दुर्गम व मागास अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिवती तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत यामध्ये आंबेझरी ते नंदप्पा जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून सर्वत्र गिट्टी पसरली आहे, याच याच रस्त्यावरून नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी, आठवडी बाजार साठी पाटण , शेणगाव मुख्य बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहरात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी व शाळकरी मुलांना याच रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
खड्डे बुजविण्याचे कामही निकृष्ट दर्जाचे
टेकामांडवा, चिखली, कुंभेझरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून केवळ खड्ड्यात गिट्टी टाकून डांबर केवळ नावापुरतेच वापरले जात आहे. कामावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची गैरहजरीमुळे कंत्राटदारांना रान मोकळे करून दिले जात आहे, त्यामुळे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे कामे करून मोकळे होत आहेत यामुळे अधिकारी व कंत्राटदार यांच्यात 'अर्थकारण ' झाल्याचा संशय बळावला आहे.
महाराष्ट्र व तेलंगाना राज्याला जोडणारा चिखली ते लेंडीगुडा लाखो रुपये खर्चून बांधकाम केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून गिट्टी पसरली आहे.
अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे रस्ते पूर्णपणे उखडत आहेत. कामाचा दोष निवारण कालावधी पाच वर्षे असताना कंत्राटदार व संबंधित विभागाचे रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने रस्त्यांना अल्पावधीतच अवकळा आली आहे. संबंधित विभागांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत