Breaking News

आश्रम शाळेतील ३१ विद्यार्थी बाधीत; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाईची मागणी

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर , जिवती : दि. १ सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील आकांक्षित जिवती तालुक्यातील श्री अंब्रु नाईक माध्यमिक आश्रम शाळा, नगराळा येथे मंगळवारी संतापजनक घटना घडली. विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिल्यानंतर प्राथमिकचे ४, माध्यमिकचे २७ असे एकूण ३१ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी व मळमळ यांसारखी लक्षणे जाणवल्यानंतर आश्रम शाळा प्रशासनाने त्यांना तातडीने राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकात पाल पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निष्कर्ष अन्न नमुन्यांची तपासणी व अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे आश्रम शाळांमधील अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि चौकशीत निष्काळजीपणा किंवा नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

यासोबतच जिवती तालुक्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया, स्वयंपाकगृहांची स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, अशी मागणीही पुढे आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भाध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे शासन व प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची त्यांनी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत